Type Here to Get Search Results !

नामनिर्देशन प्रक्रियेत उमेदवारांना दिलासा; संकेतस्थळावर कागदपत्र अपलोडची गरज नाही

किनवट : नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्रातील माहिती ऑनलाइन भरताना कोणतीही पूरक कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करण्याची आवश्यकता नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. मात्र, ऑनलाइन भरलेल्या माहितीची छापील प्रत (प्रिंटआऊट) काढून त्यावर उमेदवार व सूचकांच्या स्वाक्षऱ्या करून आवश्यक कागदपत्रांसह संपूर्ण संच प्रत्यक्षपणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे जमा करावा लागणार आहे.

राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांच्या नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यासाठी आयोगाने खास विकसित केलेले https://mahasecelec.in हे संकेतस्थळ उमेदवारांना १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत २४ तास उपलब्ध राहणार आहे. उमेदवारांनी नोंदणी करताना निर्माण होणारा लॉगिन आयडी व पासवर्ड सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. कारण नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातील सर्व माहिती ऑनलाइन भरण्यासाठी त्यांची आवश्यकता असते.

माहितीची ऑनलाइन नोंद पूर्ण केल्यानंतर मिळालेल्या प्रिंटआऊटवर उमेदवार आणि सूचकांच्या स्वाक्षऱ्या करून, नादेय प्रमाणपत्र, स्वच्छतागृह वापर प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणापत्र, निवडणूक खर्चासाठीचे बँक खाते तपशील, राखीव प्रवर्ग असल्यास जातप्रमाणपत्र, आणि पक्षीय उमेदवारांसाठी जोडपत्रे अशा सर्व आवश्यक कागदपत्रांसह संच १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत दाखल करणे बंधनकारक आहे.

विशेष म्हणजे, नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची प्रक्रिया शनिवारी (ता.१५) सुट्टीचा दिवस असूनही सुरू राहणार आहे. मात्र रविवारी (ता. १६) नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार नाहीत, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या सूचना सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या या सूचनांमुळे नामनिर्देशन प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.



Post a Comment

0 Comments