नांदेड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीने एकत्र लढण्याची घोषणा करत जिल्हा राजकारणात नवे समीकरण उभे केले होते. पण जागावाटपावरून निर्माण झालेल्या मतभेदांमुळे केवळ अकरा दिवसांतच दोन्ही पक्षांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे .वंचित बहुजन आघाडीने काँग्रेससोबतचा आघाडी करार मोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. या संदर्भात आघाडीचे समन्वयक अविनाश भोसीकर हे पत्रकार परिषद घेऊन अधिकृत भूमिका मांडणार आहेत.
११ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील काँग्रेसचे खा.प्रा. रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष हनमंत पा. बेटमोगरेकर, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार तसेच वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद, महासचिव श्याम कांबळे , जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले यांच्या उपस्थितीत संयुक्त पत्रकार परिषदेत आघाडीची घोषणा झाली होती. यानंतर भाजपला कडवे आव्हान निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली होती.
मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीमध्ये नाराजी पसरली. नगरसेवक पदांसाठी अगदी नगण्य जागा वंचितला मिळाल्या असून १३ स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी एकाही ठिकाणी नगराध्यक्षपदावर संधी न मिळाल्याचा आरोप वंचितने केला आहे. याउलट वंचितने ज्या ठिकाणी उमेदवार उभे केले, तेथे काँग्रेसने त्यांच्या विरोधात एबी फॉर्म दिल्याचे बोलले जात आहे.
या परिस्थितीमुळे समसमान वाटपाच्या तत्त्वाला काँग्रेसने धक्का दिल्याचे वंचितच्या नेत्यांचे मत असून त्यामुळेच युतीची सोयरिक मोडावी लागली असल्याचे समजते. धर्माध शक्तींविरुद्ध संयुक्त लढाईचा प्रारंभ झाला असतानाच दोन्ही पक्षांमध्ये निर्माण झालेली फूट जिल्हा राजकारणाचे चित्र बदलणारी ठरणार आहे.