किनवट : नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. ७ मधून अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेल्या नगरसेविका ललिता मारोती मुनेश्वर यांच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी मारोती मुनेश्वर यांनी रा. काँग्रेस नेत्या बेबीताई नाईक व अॅड. राहुल नाईक यांची नुकू सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुनेश्वर यांचा बेबीताई नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच बेबीताई नाईक यांनीही निवडून आलेल्या नगरसेविका सौ. मुनेश्वर यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी दलित चळवळीतील कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले मारोती मुनेश्वर यांना आगामी सभागृहात उपनगराध्यक्ष पदाची संधी द्यावी, अशी मागणी चळवळीचे नेते विनोद भरणे यांनी केली. नगरातील वंचित घटकांचे प्रश्न प्रभावीपणे सभागृहात मांडण्यासाठी अनुभवी, तळागाळातील कार्यकर्त्याला प्रतिनिधित्व मिळायला हवे, अशी अपेक्षा भरणे यांनी यावेळी व्यक्त केली.
मागणी संदर्भात प्रतिक्रिया देताना श्रीमती बेबीताई नाईक म्हणाल्या, “सर्व घटनांची समीक्षा करून, चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. चळवळीतील कार्यकर्त्यांचा सन्मान राखत योग्य व्यक्तीला संधी देण्याचा आमचा प्रयत्न असेल.”
बैठकीत शंकर नगराळे व दिलीप मुनेश्वर यांची उपस्थिती लक्षणीय होती. परस्पर संवादाच्या माध्यमातून आगामी विकासकामे, समाजकल्याण आणि शहरातील मूलभूत सुविधांवरही चर्चा झाली असल्याचे समजते. आगामी नगरपरिषद सभागृहाच्या राजकारणाला या भेटीमुळे नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Tags
||जिल्हा||


