निम्न पैनगंगा प्रकल्पात पेसा कायद्याचे उल्लंघन : मेधा पाटकरांचा आरोप


किनवट : साने गुरुजी इमर्जन्सी अॅण्ड मल्टीस्पेशालिटी विश्वस्त रुग्णालय लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने किनवट येथे आगमन झालेल्या राष्ट्रीय जन आंदोलनाच्या नेत्या मेधाताई पाटकर यांना निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती (विदर्भ-मराठवाडा) तर्फे निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारून समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना पाटकर यांनी निम्न पैनगंगा प्रकल्पाबाबत सरकारवर गंभीर आरोप केले.

मेधाताई म्हणाल्या की, आदिवासी क्षेत्रात ग्रामसभेची परवानगी न घेता कोणत्याही प्रकल्पाची कामे हाती घेणे हे पेसा कायद्याचे उल्लंघन असून, संविधानातील तरतुदीनुसार ग्रामसभेचा विश्वास न घेणे हे अन्यायकारक आहे. “कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना सरकारकडून सक्तीने कामे राबविणे हा कायद्याचा अवमान असून महाराष्ट्रातील अनेक भागांत अशीच परिस्थिती दिसते,” अशी टीका त्यांनी नोंदवली.
   कार्यक्रमानंतर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी मेधाताई पाटकरांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रकल्पासंबंधी सविस्तर माहिती दिली. ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी २८ वर्षांपासून सुरू ठेवलेल्या लढ्याचे पाटकरांनी कौतुक करत त्यांच्या चिकाटीला शाबासकी दिली. जमीन वाचविण्यासाठी आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे, सरकारी दबाव यांना न डगमगता आंदोलन शांततेच्या व अहिंसेच्या मार्गाने चालू ठेवावे, अशी मार्गदर्शनपर सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिली.
केंद्रीय जल आयोगाची मान्यता नसताना धरणाच्या कामास गती देणे हा कायदा व संविधानाचा अपमान असल्याचे मतही पाटकरांनी व्यक्त केले.
याप्रसंगी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप, प्रसिद्धी प्रमुख व संघटक सचिव मुबारक तंवर, कोषाध्यक्ष प्रल्हादराव गावंडे, डॉ. बाबा डाखोरे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp