गोकुंदा ग्रामपंचायतीत ‘अनधिकृत हस्तक्षेप’ व गैरव्यवस्थापनाचा आरोप

किनवट : तालुक्यातील सर्वात मोठी पेसा अंतर्गत गोकुंदा ग्रामपंचायत सध्या गंभीर गैरव्यवस्थापन, निधीचा अपव्यय आणि मनमानी कारभारामुळे चर्चेत आली आहे. सरपंच पद महिलेसाठी राखीव असूनही त्यांच्या पतींचाच कारभारात अनधिकृत हस्तक्षेप असल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरत आहे.

सरपंचांच्या पतीकडून घेतले जाणारे निर्णय, ग्रामसभेत न होणारी चर्चा, तसेच ग्रामसेवक अनुपस्थित असल्याने संपूर्ण कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निधीची मोठी रक्कम येणारी असल्याने गोकुंदा ही पेसा अंतर्गत महत्त्वाची ग्रामपंचायत मानली जाते. मात्र निधीचा योग्य वापर न होता काही सदस्य व अधिकाऱ्यांमध्ये ‘हातमिळवणी’ सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

ठक्कर बाबा योजना अंतर्गत मंजूर असलेल्या अनेक रस्त्यांचे काम कागदावरच राहिल्याचा आणि निधी हडप झाल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. अनेक प्रस्तावांबाबत विचारणा केली असता ग्रामपंचायत उत्तर देण्यास असमर्थ ठरत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

गावातील स्वच्छतेचा प्रश्न तर दिवसेंदिवस गंभीर होत असून गटारांचे पाणी रस्त्यावर वाहू लागले आहे. नाल्यांचे साचलेले पाणी, रस्त्यांवरील खड्डे, कचऱ्याचे ढिगारे यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

ग्रामसेवक बराच वेळ अनुपस्थित राहिल्याने कोणत्याही कामासाठी अनेक दिवस चकरा माराव्या लागत असल्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. प्रलंबित फाईल्स, कार्यालयातील गैरहजेरी आणि दुर्लक्षामुळे ग्रामपंचायतीचे सर्वच कामकाज ठप्प झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या सर्व प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी पंचायत समिती प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp