किनवट : नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपमधील सुरू असलेली अस्वस्थता पुन्हा प्रकाशात आली आहे. नगराध्यक्ष पदासाठी सुरुवातीपासूनच अनेक इच्छुकांची नावं पुढे येत होती. अखेर पक्ष नेतृत्वाने सर्व्हेच्या आधारे विद्यमान नगराध्यक्षांच्या पत्नीवर शिक्कामोर्तब केले. या निर्णयामुळे काही पदाधिकारी नाराज झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रचारात काही कार्यकर्त्यांनी दुरी ठेवली, तर काहींकडून ‘वरवरची साथ’ दाखवल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
विरोधी प्रचाराची हकीकत आणि ‘रडार’वरील चेहरे
निवडणुकांच्या काळात अधिकृत उमेदवारापेक्षा पर्यायी उमेदवाराचा प्रचार काही जणांनी पुढे करून दिल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात आहे. अशी कार्यपद्धती पक्षश्रेष्ठींच्या नजरेतून सुटलेली नाही, अशी माहिती मिळते. विशेषतः आमदार भीमराव केराम यांच्याकडून पक्षविरोधी कामावर लक्ष ठेवले जात असल्याचे बोलले जात आहे.
निकालानंतर कारवाईचे पडसाद?
शेवटच्या सभेत आमदारांनी पक्षनिष्ठेचा मुद्दा मोठ्या आवाजात उपस्थित केला. त्यामुळे येत्या २१ डिसेंबरच्या निकालानंतर ‘गैरहजर’ आणि ‘फितूर’ चेहऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे. कोणाला धक्का, तर कोणाला अभय मिळणार, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
उमेदवारी न मिळाल्याचे गालबोट
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या किनवट भेटीदरम्यान अनेक इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन करून आपापला दावा भक्कम करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र उमेदवारी न मिळाल्याने नाराजीचे वातावरण कायम असल्याचे दिसून आले.
“चार वर्षे अजून बाकी... लक्षात ठेवा!”
निवडणुकीच्या प्रचारात आमदार केराम यांनी दिलेला इशारा विशेष चर्चेत आहे. “ज्यांनी माझ्या सोबत राहून मिळवलं ते सर्वांना माहिती आहे. मतदानाच्या काळात हस्तक्षेप करू नका. अन्यथा नंतर जबाबदारी घ्यावी लागेल,” असे ते म्हणाले. “समाजात विघ्न निर्माण करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे, अजून चार वर्षे माझे बाकी आहेत,” असे आवर्जून नमूद करत त्यांनी काहींना थेट संदेश दिल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.
Tags
||जिल्हा||
