लोकशाही शिस्तीतून संघटनबळ; महा. अंनिसची राज्य कार्यकारिणी बैठक किनवटमध्ये संपन्न


किनवट‌ : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (महा. अंनिस) राज्य कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक दि. ३ व ४ जानेवारी रोजी भारत जोडो युवा अकादमी संचलित साने गुरुजी इमर्जन्सी अँड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, कोठारी एमआयडीसी,किनवट (जि. नांदेड) येथे उत्साहात पार पडली. या बैठकीस राज्यातील २५ जिल्ह्यांतील जिल्हा कार्याध्यक्ष, प्रधान सचिव व राज्य पदाधिकारींसह एकूण ७८ प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

संजय बनसोडे- राज्य कार्याध्यक्ष

•माधव बावगे- राज्य अध्यक्ष 


   उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष माधव बावगे हे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, भारत जोडो युवा अकादमीचे अध्यक्ष डॉ. अशोक बेलखोडे, महा. अंनिस जिल्हाध्यक्ष गुणवंतराव पाटील हंगरगेकर, किरण चिद्रावार यांच्यासह राज्य प्रधान सचिव डॉ. ठाकसेन गोराने, गजेंद्र सुरकार, विनायक सावळे, विजय परब, राज्य सरचिटणीस शहाजी भोसले, कृष्णात स्वाती, आरती नाईक, विलास निंभोरकर, उत्तरेश्वर बिराजदार, सुरेश बोरसे हे उपस्थित होते.           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष तुलसीदास शिंदे यांनी केले, तर प्रास्ताविक राज्य कार्यवाह डॉ. बालाजी कोम्पलवार यांनी केले. स्वागतपर भाषणात डॉ. अशोक बेलखोडे यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत केले. संजय बनसोडे यांनी निसर्गरम्य वातावरणात बैठक घेण्याची संधी दिल्याबद्दल संस्थेचे व रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले. 

    यानंतर बैठकीच्या प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात झाली. प्रत्येक जिल्हा कार्याध्यक्षांनी त्यांच्या जिल्ह्यातील शाखांची संख्या तसेच मागील चार महिन्यांत राबविण्यात आलेल्या संघटनात्मक उपक्रमांचा अहवाल सादर केला. त्याचबरोबर जिल्हा प्रधान सचिवांनी पुढील चार महिन्यांचे नियोजन लेखी स्वरूपात मांडले. महा. अंनिसची कार्यपद्धती २३ संघटनात्मक विभागांद्वारे राबवली जाते. प्रत्येक विभागाचे राज्य कार्यवाह व सहकार्यवाह यांनी विभागनिहाय कामाचा आढावा व आगामी नियोजन सादर केले. सर्व निर्णय लोकशाही पद्धतीने, सर्वांच्या सूचनांचा विचार करून घेण्यात आले. संसदेप्रमाणे काटेकोर व शिस्तबद्ध पद्धतीने बैठक चालते, याचे यावेळी प्रकर्षाने दर्शन झाले.

संघटनात्मक बांधणीसाठी दरवर्षी सभासद नोंदणी केली जाते. शाखा कार्यकारिणीची निवड दरवर्षी, जिल्हा कार्यकारिणीची दर दोन वर्षांनी तर राज्य कार्यकारिणीची दर तीन वर्षांनी निवड होते. मजूर ते उच्चशिक्षित अशा विविध स्तरांतील कार्यकर्ते कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता केवळ विचारनिष्ठेने कार्य करीत आहेत. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली उभी राहिलेली ही चळवळ त्यांच्या पश्चातही “आम्ही सर्व दाभोलकर” या निर्धाराने अधिक बळकट झाली आहे. शासनाच्या आर्थिक सहकार्याविना, केवळ लोकसहभागातून हे कार्य प्रभावीपणे सुरू आहे.

३ जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती व १२ जानेवारी जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या महिला प्रबोधन अभियानाची यावर्षीची संकल्पना “वसा साऊ जिजाऊचा – जात, धर्म, लिंगभेदमुक्तीचा” अशी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

समारोप सत्रात किनवट येथील संघटनेचे पदाधिकारी, हितचिंतक व आधारस्तंभांचा परिचय करून देत त्यांचा संघटनेच्या दिनदर्शिकेने सत्कार करण्यात आला. यात उमाकांत इंगोले, माजी नगराध्यक्ष के मूर्ती, प्रा.डाॅ. पंजाब शेरे, प्रा.डाॅ. सुनील व्यवहारे, ॲड. मिलिंद सरपे, योग गुरु अखिल खान, प्रा.डाॅ. प्रज्ञा घोडवाडीकर,दिलिप पाटील,दीपा.सोनकांबळे, रेखा पाटील, डॉ. योगराद्र वरटकर, डॉ. भाग्यश्री बेलखोडे, बाबा सूर्यवंशी, यांचेसह अनेक मान्यवार उपस्थित होते तसेच स्वयंपाकी व व्यवस्थेत योगदान देणाऱ्या सहकाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. डॉ. अशोक बेलखोडे यांच्या मनोगतानंतर ‘हम होंगे कामयाब’ या गीताने बैठकीची सांगता झाली.


Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp