मुंबई : अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात 26 जून 2026 रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे भव्य "उपवर्गीकरण नको" महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार असून राज्यभरातील आंबेडकरी समाज, विविध सामाजिक संघटना आणि आरक्षण लाभार्थ्यांना मोठ्या संख्ये
ने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मोर्चाच्या माध्यमातून "उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करा" ही प्रमुख मागणी शासनाकडे मांडण्यात येणार आहे. आयोजकांनी "चलो मुंबई, चलो क्रांतीभूमी मुंबई" तसेच "चलो आझाद मैदान" अशा घोषणांद्वारे समाजातील सर्व घटकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी राज्यातील गाव, तालुका, शहर आणि महानगरांमधून सामूहिक कार रॅली काढून मुंबईतील आझाद मैदानावर एकत्र येण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गोंदिया ते मुंबईपर्यंत विविध जिल्ह्यांतून कार रॅली सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
आयोजकांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिलेल्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सर्वांनी संघर्षात सहभागी होणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. "हक्क लढूनच मिळतात आणि मिळालेले हक्क टिकवण्यासाठी अधिक मोठा संघर्ष करावा लागतो," असा संदेशही देण्यात आला आहे.
हा महामोर्चा अनुसूचित जाती एकता समिती, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांनीही सहभाग व पाठिंबा जाहीर केला आहे. मोर्चा 26 जून रोजी दुपारी 12 वाजता आझाद मैदान, मुंबई येथे होणार आहे.
आयोजकांनी राज्यातील सर्व आंबेडकरी संघटना, कार्यकर्ते, युवक, महिला आणि आरक्षण लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधातील लढा अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले आहे.
"जय भीम, जय संविधान"च्या घोषणांनी मुंबई दणाणून सोडण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.