किनवट दि.१३ : आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक संपन्न मानली जाणारी गोकुंदा(ता.किनवट)ग्रामपंचायत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. लाखो रुपयांच्या विविध विकास योजनांचा निधी हाताळणारी आणि प्लॉटिंग व्यवसायातून मोठी आर्थिक उलाढाल करणारी ही ग्रामपंचायत दिव्यांग बांधवांबाबत मात्र अतिशय संवेदनाशून्य असल्याचे समोर आले आहे.
दिवाळीच्या तोंडावर ग्रामपंचायतीकडून दिव्यांगांना केवळ दोन हजार रुपयांचा चेक देण्यात आला असून, या निर्णयामुळे ग्रामस्थ आणि सामाजिक संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
ग्रामपंचायतीत अनेक वर्षांपासून प्लॉट रजिस्ट्रीसाठी आवश्यक असलेल्या गावठाण प्रमाणपत्रासाठी दहा-दहा हजार रुपयांची वसुली होत असल्याची चर्चा ग्रामस्थांत आहे. मात्र, या प्रमाणपत्रांच्या नोंदी कुठेच उपलब्ध नसल्याचे किनवट येथील उपनिबंधक कार्यालयातील मागील दहा वर्षांच्या अभिलेखांवरून स्पष्ट होत असल्याचे स्थानिक सूत्रांनी सांगितले.
आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही ग्रामपंचायतीकडून दिव्यांग बांधवांना केवळ दोन हजार रुपयांचा दिलासा देणे म्हणजे गरीबांच्या भावना दुखावणारा प्रकार असल्याची भावना व्यक्त होत आहे. वास्तवात, वर्षअखेरीस म्हणजे ३१ मार्चपर्यंत निधी वाटप करणे बंधनकारक असताना, दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी घाईघाईत वाटप करून केवळ औपचारिकता पूर्ण केल्याचे स्पष्ट दिसून येते.
ग्रामस्थांमध्ये या प्रकाराबद्दल प्रचंड नाराजी असून, “आर्थिकदृष्ट्या श्रीमंत असलेल्या ग्रामपंचायतीने समाजातील वंचित घटकांशी असा उपहास करणे लाजिरवाणे आहे,” अशा प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहेत.
||स्थानिक उत्पनाच्या पाच टक्के रक्कम दिव्यांगाना वाटप करावी,असा दिव्यांग कायदा -२०१६ सांगतो.पाच टक्के रक्कम वाटप केली नसल्यास आपण या ग्रामपंचायतीला कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही,असे सेक्युलर दिव्यांग मुव्हमेंट या संघटनेने जिल्हाध्यक्ष ॲड.मिलिंद सर्पे यांनी सांगितले आहे.||
Tags
जिल्हा