पुणे : सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या चित्रपटांना व्यासपीठ देणारा ८वा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, पुणे २०२५ येत्या रविवार, २८ डिसेंबर २०२५ रोजी भव्य स्वरूपात संपन्न होणार आहे. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग तसेच महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने आणि निर्मिती मीडिया सोल्यूशन्स यांच्या आयोजनाखाली होणाऱ्या या महोत्सवात चित्रपट पुरस्कार वितरण समारंभ व निळुभाऊ फुले कलाकार-कार्यकर्ता पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात येणार आहेत.
हा सोहळा सायंकाळी ७.०० ते रात्री ९.०० या वेळेत पुण्यातील राष्ट्रीय फिल्म संग्रहालय (लॉ कॉलेज रोड) येथे आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून MIT-WPU आणि Dadasaheb Phalke International Film School यांचे सहकार्य लाभले आहे.
या कार्यक्रमाला अभिनेते व ‘नाम फाउंडेशन’चे संस्थापक मकरंद अनासपुरे, ज्येष्ठ नाटककार-प्राध्यापक प्रा. सतीश आळेकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिनभाऊ साठे, अभिनेत्री चिन्मयी सुमित आणि संदीप भाऊ ससाणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तसेच दिग्दर्शक व महोत्सव परीक्षक सुनिल सुकथनकर, उमेश कुलकर्णी, दिग्दर्शक अभिजित पानसे, चित्रपट समीक्षक डॉ. संतोष पाठारे व निलेश रसाळ, गायिका राधा खुडे आणि स्वाती कडू यांची उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे. सूत्रसंचालन प्रतिमा परदेशी करणार आहेत.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समतावादी विचारांचा प्रसार, सामाजिक वास्तव मांडणाऱ्या चित्रपटांना प्रोत्साहन आणि कलाकार-कार्यकर्त्यांचा सन्मान, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अण्णाभाऊ साठे चित्रपट महोत्सव समिती यांनी केले आहे.
Tags
||महाराष्ट||

