मनरेगातील बोगस कामांचा नवा घोटाळा; वाई बाजारात ८० लाखांचा हडपप्रकार उघड

किनवट : माहूर तालुक्यातील वाई बाजार परिसरात मनरेगा योजनेंतर्गत झालेल्या २३ कामांमध्ये मोठ्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला आहे. उपसरपंच व संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमताने खोटा सर्वे नंबर दाखल करीत एका आयकरदात्याच्या नावावर जॉबकार्ड तयार केले. त्यावर बनावट मजूर आणि वर्ककोड दाखवून तब्बल ८० लाख रुपये उचलल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला.

सरकारी योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा म्हणून शासन प्रयत्नशील असताना काही ठिकाणी प्रशासनच योजना कुरतडताना समोर येत आहे. मनरेगासारख्या ग्रामीण रोजगार योजनांवर काही कर्मचारी–अधिकाऱ्यांनी अक्षरशः डल्ला मारल्याचे या प्रकरणातून स्पष्ट होते. वाई बाजार येथे शेततळे, सिंचन विहीर, वृक्ष लागवड, रोपवाटिका आणि गोठे अशा विविध कामांना मंजुरी घेण्यात आली. मात्र प्रत्यक्षात जमीन अस्तित्वात नसतानाही कागदोपत्री ती दाखवून देयके काढली गेल्याचे आढळले.

दरम्यान, माहूर व किनवट तालुक्यात मनरेगातील भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरणे असल्याची चर्चा असून कोट्यवधींचा अपहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यांतील सर्व मनरेगा कामांची सर्वंकष चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

सदर प्रकारात गेल्या पंधरा महिन्यांपूर्वी चौकशी सुरू झाली होती. आता चौकशी पूर्ण झाल्यानंतरही देयकांची प्रक्रिया कशी विनाविलंब झाली, बोगस जॉबकार्ड, खोटे वर्ककोड आणि अस्तित्वात नसलेली जमीन या साखळीत कोणकोण सहभागी होते, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणामागे मोठे नेटवर्क कार्यरत असल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp