आम्ही पाहिलेले ‘फुले’ हरपले : समाजवादी विचारांचे ज्येष्ठ आधारस्तंभ डॉ. बाबा आढाव यांचे निधन


पुणे : “आपण फुलेंना पाहिले नाही; पण बाबा आढाव हेच आम्ही पाहिलेले फुले होतो…”—अशा शब्दात समाजवादी चळवळीतील हजारो कार्यकर्त्यांनी आपल्या जिवलग मार्गदर्शकाला अखेरचा निरोप दिला. ज्येष्ठ समाजवादी नेते, परिवर्तनवादी चळवळीचे नेतृत्व करणारे आणि असंघटित कामगारांचे आयुष्यभर आधारवड राहिलेले डॉ. बाबा आढाव यांचे सोमवारी(ता .८)रात्री साडेआठ वाजता पुण्यात दुःखद निधन झाले.

कॅन्सर, वाढते वय आणि अखेरीस झालेल्या न्युमोनियामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील पुना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मृत्यूशी झुंज देत असताना त्यांनी शांतपणे जगाचा निरोप घेतला.

डॉ. आढाव यांनी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता–न्यायाच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरवले. असंघटित कामगार वर्गाच्या संघटनापासून ‘एक गाव–एक पाणवठा’ सारख्या ऐतिहासिक आंदोलनापर्यंत बाबांचे संपूर्ण आयुष्य समाज परिवर्तनात खर्ची पडले. ते केवळ विचारवंत नव्हते, तर जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे नेता होते.

धर्मांध आणि जातीयवादी प्रवृत्ती मजबूत होत असताना बाबा आढाव यांसारख्या निर्भय, पुरोगामी, लढवय्या व्यक्तिमत्त्वाचे निधन ही समाजवादी चळवळीतील फार मोठी पोकळी आहे. फुले–शाहू–आंबेडकर विचारधारेचे प्रवर्तन करणाऱ्या या महात्म्याची उणीव भविष्यात भरून निघणे कठीणच आहे.

या विचार–कार्याला हजारो कार्यकर्त्यांचा परिवार लाभला; परंतु आज या परिवारानेच आपल्या पित्यासमान मार्गदर्शकाला गमावले आहे.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp