किनवट : “बोली जगवा, बोली वाचवा! भाषा वाचवा, संस्कृती टिकवा!” या प्रभावी संदेशासह मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ‘बोलीचा जागर’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व सरस्वती विद्या मंदिर, कला महाविद्यालय, किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम बुधवार, दि. २१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत, सरस्वती विद्या मंदिर, कला महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न होणार आहे.
मराठी भाषा ही विविध बोलींनी नटलेली समृद्ध भाषा असून, तिच्या प्रादेशिक बोली म्हणजेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतिबिंब आहे. या बोलीभाषांचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून किनवट येथे ‘बोलीचा जागर’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती शिक्षण संस्था, किनवटचे अध्यक्ष व्यंकटराव नेम्मानीवार यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरस्वती विद्या मंदिर, कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भंडारे असणार आहेत.
कार्यक्रमात बोलीभाषा अभ्यासक व भाषा तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेडचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर हे “व्यवसाय बोली” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच प्रज्ञा प्रतिष्ठान अध्यापक महाविद्यालय, नांदेडचे प्राचार्य डॉ. राजू मोतेराव “कोलामी बोली” या विषयावर सखोल मांडणी करणार आहेत.
या कार्यक्रमास महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा व उद्योग मंत्रालयाचे मंत्री डॉ. उदय सामंत, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, भाषा संचालनालयाचे संचालक अरुण गिते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच आदिवासी गिरीजन पुरस्कार प्राप्त कलावंत मोहन मेश्राम, वाद्य निर्मिती पुरस्कार प्राप्त भालेराव दडांजे, लक्ष्मीबाई टिळक साहित्य पुरस्कार प्राप्त डॉ. वसंत राठोड यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शिवशक्तीनगर, घोगरवाडी व तलाईगुडा येथील कोलाम लोककलाकारांचे पारंपरिक लोककला सादरीकरण, शोभायात्रा व बोलीभाषांवरील संवाद सत्रे. या माध्यमातून कोलामीसह विविध बोलींचे जिवंत दर्शन घडणार आहे.
मराठी भाषेच्या विविध बोलींचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, त्यातून भाषिक अस्मिता बळकट करणे आणि सांस्कृतिक परंपरेचे संवर्धन करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या अर्थपूर्ण उपक्रमास भाषा-प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.