किनवट : शहराच्या विकासासाठी दिलासादायक बातमी समोर आली असून, केंद्र शासनाच्या विशेष सहाय्य योजनेअंतर्गत किनवट नगरपालिकेच्या दोन महत्त्वाच्या विकास प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांसाठी एकूण सुमारे ४८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने ९ जानेवारी २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे.
या निर्णयानुसार शहरातील जुन्या गुरांच्या बाजाराच्या जागेवर आधुनिक दुकान केंद्र विकसित करण्यासाठी १७ कोटी ११ लाख ३१ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हा प्रकल्प मंजूर विकास आराखड्यानुसार राबविण्यात येणार असून, यामुळे शहरातील व्यापारी सुविधा अधिक नियोजनबद्ध व आधुनिक स्वरूपात उपलब्ध होणार आहेत.
त्याचप्रमाणे भाजीपाला मार्केट परिसरात सुसज्ज भाजीपाला बाजार व व्यापारी संकुल उभारण्यासाठी ३१ कोटी ३१ लाख ९९ हजार रुपये मंजूर झाले आहेत. या प्रकल्पामुळे शेतकरी, किरकोळ व्यापारी तसेच ग्राहकांना एकाच ठिकाणी स्वच्छ, सुरक्षित व सोयीस्कर बाजारपेठेची सुविधा मिळणार आहे.
या दोन्ही प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याने आता निविदा प्रक्रिया, कामाचे आदेश आणि प्रत्यक्ष काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कामाच्या प्रगतीनुसार टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, हे प्रकल्प पूर्णतः केंद्र शासनाच्या निधीतून राबविले जाणार आहेत.
“बाजार व व्यापारी संकुलामुळे व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांना आधुनिक सुविधा मिळणार आहेत. मंजूर प्रकल्प वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करणे हे नगरपालिकेचे प्राधान्य राहील.”
— सुजाता विनोद एंड्रलवार, नगराध्यक्षा
Tags
||जिल्हा||

