किनवट, ता. १० : नगर परिषदेच्या राजकारणात महत्त्वाची व निर्णायक घडामोड घडली आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिव सेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) यांनी एकत्र येत १० नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन केला आहे. या गटाच्या गटप्रमुखपदी सुजाता येंड्रलवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यासंदर्भातील अधिकृत प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला आहे.
शिवसेना (उ.बा.ठा.)चे जिल्हाप्रमुख जोतिबा खराटे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने शुक्रवारी (ता. ९) नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांची भेट घेतली. यावेळी १० नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्यांसह स्वतंत्र गट स्थापन केल्याचे पत्र सादर करून, प्रशासकीय नियमांनुसार अधिकृत नोंदणी करण्याची विनंती करण्यात आली.
नेतृत्वाची मोठी जबाबदारी सुजाता येंड्रलवार यांच्यावर
महाविकास आघाडीच्या नेते व नगरसेवकांनी एकमताने या गटाचे नेतृत्व नगराध्यक्षा सुजाता येंड्रलवार यांच्याकडे सोपवले आहे. त्यांच्या अनुभवसंपन्न व समन्वयक नेतृत्वामुळे शहरातील विकासकामांना वेग मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
या १० सदस्यांच्या गटामुळे नगर परिषदेतील सत्ता-समीकरणे अधिक स्पष्ट झाली असून, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यातील मजबूत समन्वयामुळे महाविकास आघाडीची पकड अधिक घट्ट झाल्याचे चित्र आहे. आगामी काळात शहराच्या विकास आराखड्यांवर व धोरणात्मक निर्णयांवर या गटाचे प्रभावी वर्चस्व राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
या निर्णयानंतर महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, १० नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करून आनंद व्यक्त केला.
Tags
||जिल्हा||
