वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अल्पवयीन मुलांवरच नव्हे, तर संबंधित पालकांनाही दोषी धरले जाणार असून त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, मोटार वाहन कायद्यातील कलम ३, ४, ५, १८०, १८१ तसेच जुवेनाईल जस्टीस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलांनी ५० सीसीपेक्षा जास्त क्षमतेचे वाहन चालविल्यास तब्बल २५ हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. तसेच चालक, वाहनमालक व पालकांना तीन वर्षांपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा होऊ शकते. अपघात झाल्यास संबंधित वाहनाचा विमा (इन्शुरन्स) दावा नाकारला जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
गुन्हा दाखल झाल्यास त्या अल्पवयीन मुलांच्या भविष्यातील नोकरी, पासपोर्ट, चारित्र्य प्रमाणपत्र आदी बाबींवर गंभीर परिणाम होऊ शकतो. दंडात्मक कारवाई झाल्यास संबंधित मुलांना २५ वर्षांचे वय पूर्ण होईपर्यंत वाहन परवाना नाकारला जाऊ शकतो किंवा किमान एक वर्षासाठी वाहन नोंदणी रद्द केली जाण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने सर्व पालकांना कळकळीचे आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या अल्पवयीन पाल्यांच्या हाती कोणतेही वाहन देऊ नये व त्यांच्या जीवाशी खेळ करू नये. सुरक्षिततेच्या दृष्टीने सायकल किंवा ई-सायकलचा पर्याय उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय, शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांनी चालक परवाना, आर.सी. बुक व इन्शुरन्सची कागदपत्रे नेहमी सोबत ठेवणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले आहे. मोटारसायकल व बुलेटधारकांकडून मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणाऱ्या सायलेंसरचा वापर आढळल्यास थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. विनानंबर प्लेट किंवा पासिंग क्रमांक नसलेल्या वाहनांवरही कठोर कारवाई होणार असून, व्यापारी व वाहनधारकांनी रस्त्यावर अडथळा निर्माण होईल असे पार्किंग टाळून नियमाप्रमाणे पार्किंग करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यापुढे किनवट पोलीस स्टेशनच्या हद्दीत वारंवार विशेष मोहिमा राबवून या सर्व सूचनांच्या अनुषंगाने कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी दिली आहे.