किनवट: महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत किनवट शहराच्या वाढत्या वस्त्यांसाठी मंजूर पाणीपुरवठा योजना प्रशासकीय दुर्लक्ष आणि कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे पूर्णपणे रखडली आहे. तब्बल १९ कोटी ४ लाख रुपये खर्च झाले तरी कामाची मुदत संपून पाच वर्षांहून अधिक वेळ लोटला, तरीही शहरातील अनेक वस्त्या नियमित पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. यामुळे योजनेचा बोजवारा उडाला असून, नेते-प्रशासन कंत्राटदारावर नियंत्रण ठेवत नाही का? असा संतप्त प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
९ एप्रिल २०२१ रोजी हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते, सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या उपस्थितीत या योजनेचा भव्य शुभारंभ झाला. मात्र कोविड काळाचे बहाणे करून सुरुवातीला संथ गतीने चाललेले काम नंतर पूर्णपणे थांबले. चार-सहा महिन्यांनी थोड -थोड काम दाखवून बिले काढून घेण्यावरच कंत्राटदाराचा भर असल्याची टीका उघडपणे होत आहे.अकोला येथील ए. पी. अँड जे. पी. असोसिएट्स (जे. व्ही.) या कंपनीकडे कामाचे कंत्राट आहे. मात्र कामात गंभीर चुका उजेडात आल्या आहेत. नवीन जलवाहिन्या टाकण्याऐवजी जुन्या नळयोजनेतील पाइपचा वापर केल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.
शहरातील सीमेंट काँक्रीट रस्ते फोडून जलवाहिन्या टाकल्या, पण कामानंतर रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने वाहनचालक आणि पादचारी त्रास सोसत आहेत.कंत्राटदाराला सतत मुदतवाढ मिळूनही काम अपूर्ण असल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी आहे. एवढा मोठा निधी खर्च झाला तरी लोकप्रतिनिधी कंत्राटदाराला जाब विचारत नाहीत, हे नेते गप्प का? कंत्राटदाराने सर्वांची तोंडे बंद केलीत का? अशी चर्चा शहरात रंगली आहे.नव्या सत्ताधाऱ्या आल्याने या रखडलेल्या योजनेला गती मिळेल का, याकडे लक्ष आहे. गुणनियंत्रण विभागाने सखोल चौकशी करावी, अंदाजपत्रकाप्रमाणे काम पडताळणी होईपर्यंत उर्वरित देयके रोखावीत, अशी मागणी जोर धरत आहे.
