‘साऊ ते जिजाऊ’ आरोग्य अभियानाची किनवटात सांगता; २५ गावांतील ४०० रुग्णांना मोफत उपचार


किनवट,१३ :आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीपर्यंत राबविण्यात आलेल्या ‘साऊ ते जिजाऊ’ मोफत आरोग्य तपासणी अभियानाचा  तालुक्यात यशस्वी समारोप झाला. भारत जोडो युवा अकादमी संचलित साने गुरुजी इमर्जन्सी व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (एम.आय.डी.सी., कोठारी) आणि डॉ. अशोक बेलखोडे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

३ ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत किनवट तालुक्यातील दुर्गम व आदिवासी भागातील २५ गावांमध्ये फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविण्यात आली. या दहा दिवसांच्या अभियानात एकूण ४०० रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात आले. यामध्ये २४७ महिला व ५४ पुरुषांचा समावेश होता. तसेच जिल्हा परिषद शाळा येंदा व धामणदरी येथील ९९ विद्यार्थ्यांची आरोग्य व दंत तपासणी करण्यात आली.
या शिबिरांत प्राथमिक तपासणीसह दंतरोग, फिजिओथेरपी (भौतिकोपचार) व आयुर्वेदिक उपचार पद्धतींचा लाभ देण्यात आला. ताप, सर्दी, खोकला, सांधेदुखी तसेच महिलांच्या आरोग्याशी संबंधित आजारांवर विशेष उपचार व मार्गदर्शन करण्यात आले.
पळशी येथे समारोपीय शिबिर
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त १२ जानेवारी रोजी  पळशी येथील ग्रामपंचायत कार्यालयात अभियानाचे समारोपीय शिबिर पार पडले. या शिबिरात ७० रुग्णांनी उपचारांचा लाभ घेतला.
यावेळी डॉ. प्रगती पवार, डॉ. शिवानी बेलखोडे (फिजिओथेरपी), डॉ. दुर्गा काकडे (आयुर्वेद) व डॉ. विद्या गोलकोंडावार (दंतरोग) यांनी रुग्णसेवा बजावली.
अभियानाच्या यशस्वीतेसाठी परिचारिका सपना तामगाडगे, रितू कयापाक, कशीष निकोडे, वाहन चालक नागेश देवतळे, समुपदेशक अजय वल्हेवार व अजय जाधव यांनी पुढाकार घेतला. पळशीच्या सरपंच मंगलाताई नैताम, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे आभार मानले.



Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp