सामाजिक-आर्थिक व्यवस्था बदलल्याशिवाय स्त्रीमुक्ती अशक्य – कॉ. किरण मोघे फुले–शाहू–आंबेडकर–अण्णाभाऊ साठे व्याख्यानमाला : दुसरे पुष्प


नांदेड : नवउदारमतवादी धोरणांमुळे स्त्रियांच्या श्रमाचे अवमूल्यन होत असून त्यांच्या श्रमाची उघड लूट सुरू आहे. ही शोषणकारी व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी हिंसेचा वापर केला जातो. त्यामुळे स्त्रियांच्या दुःख, शोषण आणि अन्यायाला कारणीभूत ठरणारी सामाजिक-आर्थिक व्यवस्था बदलल्याशिवाय खरी स्त्रीमुक्ती शक्य नाही, असे ठाम मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे यांनी व्यक्त केले.

कल्चरल असोसिएशनच्या वतीने आयोजित फुले–शाहू–आंबेडकर–अण्णाभाऊ साठे व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पात त्या “स्त्रीमुक्ती चळवळीची वाटचाल : उपलब्धी आणि आव्हाने” या विषयावर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्त्री चळवळीच्या अभ्यासिका डॉ. रमा नवले होत्या. यावेळी मंचावर लता भिसे सोनावणे, विमल नवसागरे, डॉ. शीतल गोणारकर व डॉ. मंदाकिनी माहुरे उपस्थित होत्या.
आपल्या व्याख्यानात कॉ. किरण मोघे यांनी स्त्री चळवळीचा सविस्तर ऐतिहासिक आढावा घेतला. हुंडाविरोधी कायदा १९६० मध्ये अस्तित्वात आला, तर १९८० मध्ये ४९८(अ) कलम लागू झाले; मात्र तरीही हुंडाबळींचा प्रश्न सुटलेला नाही. उलट नवउदारमतवादाच्या काळात शोषणाची तीव्रता अधिक वाढली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरण हे याचे ठळक उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.


धर्म व जातीय ओळखींच्या आधारे समाजात फूट पाडली जात असून “चार मुले जन्माला घाला, घरी बसा” अशा घोषणांतून स्त्रीला परंपरेच्या चौकटीत अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे षड्यंत्र ओळखून त्याविरोधात संघटित प्रतिकार करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी स्मृतिशेष अशोक नवसागरे स्मृती पुरस्काराने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कॉम्रेड लता भिसे सोनावणे यांचा गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, सत्ता, संपत्ती व प्रतिष्ठेपासून स्त्रिया आजही वंचित आहेत. “आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क हवा” एवढीच स्त्रियांची मागणी असतानाही त्या माणूसपणावर पहारे बसवले जात आहेत. अत्याचार करणाऱ्यांचा गौरव केला जातो, तर पीडितांना न्यायासाठी लढावे लागते—या अन्यायाविरोधात स्त्री चळवळ संघर्ष करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. रमा नवले म्हणाल्या की, समाजउभारणीत स्त्रियांचे योगदान अमूल्य असतानाही त्याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झाले. स्त्रीमुक्ती ही केवळ स्त्रियांचीच नव्हे, तर माणूसपणाची लढाई असून ती स्त्री-पुरुषांनी मिळून लढली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मंदाकिनी माहुरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. शीतल गोणारकर यांनी करून दिला, तर उपस्थितांचे आभार विमल नवसागरे यांनी मानले.



Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp