बळीराम पाटील महाविद्यालयात विविध साहित्यिक उपक्रम

किनवट, ता. २२ (बातमीदार) : बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त उद्या पासून (दि.२३)विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत बोलीभाषा, लोककला, लेखनकौशल्य आणि साहित्यिक जाणिवा वृद्धिंगत करण्यावर भर देण्यात आला आहे.

    यावेळी कल्लोळकार डॉ. वसंत राठोड यांचे ‘बोलीभाषा व सद्यस्थिती’ या विषयावर, तर,प्रा. डॉ .प्रज्ञा घोडवाडीकर यांचे ‘किनवट परिसरातील बोलीचा वापर’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील माजी संचालक (विद्यार्थी कल्याण विभाग) प्रा. डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांचे ‘मराठी भाषा व लेखन कौशल्य’ या विषयावर, तर प्रा. डॉ. राजू मोतेराव यांचे आदिवासी लोककला व बोली या विषयाच्या अनुषंगाने व्याख्यान होणार आहे.
    मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कविवर्य कुसुमाग्रज यांच्या साहित्यसंपदेवर आधारित ‘जाणीव’ या भित्तीपत्रकाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘कथाकथन’ या सदराखाली विद्यार्थ्यांनी रचलेल्या कथांचा आस्वाद घेण्यात येणार आहे.याचबरोबर सामाजिक जाणिवेचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले असून, या संमेलनात महाविद्यालयातील विद्यार्थी कवी आपल्या रचना सादर करणार आहेत. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवी सांगावाकार महेंद्र नरवाडे असणार असून, प्रा. गजानन सोनोने, रामस्वरूप मडावी, रमेश मुनेश्वर, रूपेश मुनेश्वर, दीपक खंदारे, अविनाश शेरे, राजेश पाटील यांच्यासह अनेक कवी सहभागी होणार आहेत.
मराठी भाषा, बोलीभाषा आणि परिसरातील बोली यांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने हे सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. बेंबरेकर तसेच उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख डॉ. पंजाब शेरे यांनी दिली. या कार्यक्रमांचे पूर्वनियोजन मराठी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp