दिव्यांगांसाठी राखीव ५% निधी तातडीने वितरित करा – दिव्यांग मुव्हमेंट ची नगर परिषद व पंचायत समितीकडे मागणी


किनवट, दि.१३ : दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी राखीव ठेवलेला ५ टक्के निधी आर्थिक वर्ष २०२५–२६ समाप्त होण्यापूर्वी पात्र लाभार्थ्यांना वितरित करावा, अशी मागणी सेक्युलर दिव्यांग मुव्हमेंटचे नांदेड जिल्हा अध्यक्ष ॲड. मिलिंद सर्पे व सचिव दिलिप  पाटील यांनी नुकतीच केली आहे. यासंदर्भात त्यांनी नगर परिषद किनवटच्या नगराध्यक्षा सुजाता विनोद येंड्रलवार तसेच पंचायत समिती किनवटच्या गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

     निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या एकूण वार्षिक निधीपैकी किमान ५ टक्के निधी दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी राखीव ठेवून विविध योजनांची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. या तरतुदीचा उद्देश दिव्यांग नागरिकांना आर्थिक व सामाजिक आधार देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे हा आहे.
     मात्र, किनवट नगर परिषद तसेच पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील अनेक दिव्यांग नागरिकांना अद्याप या निधीचा लाभ मिळालेला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष २०२५–२६ ची मुदत ३१ मार्च २०२६ रोजी संपत असल्याने शासन नियमानुसार हा निधी पात्र लाभार्थ्यांना त्या आधी वितरित करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यामुळे किनवट नगर परिषद व पंचायत समिती अंतर्गत दिव्यांगांसाठी राखीव असलेला ५ टक्के निधी तात्काळ मंजूर करून त्याचे पारदर्शक व नियमानुसार वितरण ३१ मार्चपूर्वी करण्यात यावे, तसेच या संदर्भातील प्रशासकीय प्रक्रिया त्वरीत पूर्ण करावी, अशी मागणी ॲड. सर्पे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp