शिवाजीनगर रेल्वे अंडरब्रिजच्या निकृष्ट कामाविरोधात नगराध्यक्षा सुजाता येंड्रलवार आक्रमक


किनवट : शहरातील शिवाजीनगर परिसरातील रेल्वे अंडरब्रिजचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याची दखल घेत किनवट नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सुजाता विनोद येंड्रलवार यांनी रेल्वे प्रशासनाकडे नुकतेच सविस्तर निवेदन सादर केले आहे.       अंडरब्रिजची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी तसेच संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.शिवाजीनगर भागातील रेल्वे मार्गाखाली बांधण्यात आलेला हा अंडरब्रिज स्थानिक नागरिक, विद्यार्थी तसेच दुचाकी व चारचाकी वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, अंडरब्रिजवरील सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे वाहनांची ये-जा होताना मोठ्या प्रमाणात सिमेंटचा धूर उडत आहे. परिणामी या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना धुराच्या लोटांचा सामना करावा लागत असून डोळ्यांची जळजळ, श्वसनास त्रास तसेच इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

   या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा सुजाता येंड्रलवार यांनी दक्षिण मध्य रेल्वेचे सिकंदराबाद येथील जनरल मॅनेजर तसेच नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना लेखी निवेदन पाठवून या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. अंडरब्रिजची तांत्रिक पाहणी करून सिमेंटच्या धुरावर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक ते संरक्षणात्मक आवरण घालावे किंवा त्या ठिकाणी डांबराचा योग्य थर टाकावा, अशी मागणीही त्यांनी निवेदनात केली आहे.
तसेच संबंधित कंत्राटदाराने केलेल्या निकृष्ट कामाची चौकशी करून त्याच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान, शिवाजीनगर परिसरातील नागरिकांनी या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp