निकृष्ट कामाचा आरोप; बुद्ध विहार येथील समाजमंदिर बांधकामाची चौकशीची मागणी

किनवट : किनवट नगरपरिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ०२ मधील बुद्ध विहार परिसरात सुरू असलेल्या समाजमंदिर बांधकामावर निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप करत या बांधकामाची तातडीने तांत्रिक चौकशी करून आवश्यक असल्यास संपूर्ण बांधकाम पाडून नव्याने करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत नांदेड  जिल्हा सेक्युलर मुव्हमेंटचे अध्यक्ष ॲड. मिलिंद सर्पे यांनी नगर परिषद प्रशासन व जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन दिले आहे.

    निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र. ०२ मधील बुद्ध विहार येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना (२०२३-२४) अंतर्गत समाजमंदिर बांधकामाचे काम सुरू आहे. सुमारे १ कोटी ४० लाख ६८ हजार ९०० रुपये खर्चाच्या या कामाचे भूमिपूजन आमदार भीमराव रामजी केराम यांच्या हस्ते करण्यात आले होते. सदर कामाचा कार्यादेश क्र. १०५१/२०२४, दिनांक ५ जून २०२४ रोजी देण्यात आला असून काम पूर्ण करण्यासाठी १८० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. हे काम किनवट येथील कंत्राटदार व्यंकटराव नरसिंगराव माडपेल्लीवार यांच्याकडे आहे.
मात्र प्रत्यक्ष पाहणीदरम्यान समाजमंदिराचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसून येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. खालील स्लॅब व इमारतीची संरचना पुरेशी मजबूत नसतानाही त्यावर पहिल्या मजल्याचे बांधकाम सुरू करण्यात आले असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात कोणत्याही वेळी गंभीर अपघात होऊन जिवितहानी होण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
    या पार्श्वभूमीवर सदर बांधकामाची तातडीने तांत्रिक चौकशी (टेक्निकल ऑडिट) करण्यात यावी, निकृष्ट दर्जाचे काम त्वरित थांबवावे व तज्ज्ञ समितीकडून तपासणी करून दोष सिद्ध झाल्यास संपूर्ण बांधकाम पाडून नव्याने दर्जेदार बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर नियमाप्रमाणे कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या गंभीर प्रकरणाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp