किनवट : शासनाकडून आदिवासी व डोंगराळ भागातील पशुधनाचे आरोग्य जपण्यावर भर दिला जात असताना, किनवट येथील तालुका पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाचा कारभार मात्र ढिसाळ असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शुक्रवारी(ता.२०)सकाळी तब्बल ११.१६ वाजेपर्यंत पंचायत समितीतील या कार्यालयाला कुलूप असल्याचे आढळून आले.
नियमांनुसार कार्यालयाची वेळ सकाळी ९.४५ वाजताची असताना, दोन तास उलटूनही कार्यालय सुरू झाले नव्हते. हा प्रकार एकदाच घडलेला नसून, अनेकदा अधिकारी व कर्मचारी उशिरा येणे किंवा कार्यालय बंदच असणे, अशा तक्रारी पशुपालकांकडून सातत्याने केल्या जात आहेत.
किनवट तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत एकूण २८ दवाखाने कार्यरत आहेत. यामध्ये श्रेणी-१ चे १३, श्रेणी-२ चे १४ दवाखाने आणि एक फिरते पशुवैद्यकीय पथकाचा समावेश आहे. ग्रामीण भागातील पशुधनाच्या आरोग्याची देखभाल, लसीकरण आणि प्रजनन सुधारणा ही या यंत्रणेची मुख्य जबाबदारी आहे.
मात्र, या सर्व कामकाजावर नियंत्रण ठेवणारे मुख्य तालुका कार्यालयच वेळेत सुरू होत नसल्याने, ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांवर कोणतेही प्रभावी नियंत्रण उरले नसल्याचे दिसून येत आहे. अनेक पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याची तक्रारही वारंवार होत आहे.
या पार्श्वभूमीवर, डोंगराळ भागातील गरीब पशुपालकांना उपचारासाठी ताटकळत राहावे लागत असून, त्यांना दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने या प्रकाराची तात्काळ दखल घेऊन कारभार सुधारावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.दरम्यान, विकास प्रेमी लोकप्रतिनिधींनी याकडे जातीने लक्ष घालून परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत,अशी मागणी जागृत नागरिकांनी केली आहे.
Tags
||जिल्हा||