किनवट, ता. २१ : विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बोधडी बु.(ता.किनवट) येथे शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी(ता.२०)राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे सुमारे दीड तास वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती आणि दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
शेतकऱ्यांनी मका पिकाची हमीभावाने गावपातळीवर खरेदी सुरू करावी, खरेदीचे अधिकार महिला बचत गटांना द्यावेत, बोधडी (बु.) व इस्लापूर येथील एमएसईबी सबस्टेशनचे १० मेगावॅटपर्यंत अपग्रेडेशन करावे, तसेच बोधडी, इस्लापूर, टिंगणवाडी आदी भागात शेतीसाठी सिंगल फेज वीजपुरवठा सुरू करावा, अशा प्रमुख मागण्या यावेळी केल्या.
आंदोलनात रमेश कदम, शिवाजीराव शिंदे, त्रिभुवनसिंह ठाकूर, रामकिशन पाटील, रामराव जमादार, श्रीनिवास जमादार, गजानन चव्हाण, भारत राठोड, प्रभाकर बोड्डेवाड, अशोक शेलार, तुकाराम केंद्रे, रामेश्वर घुगे, नानू घुगे, ज्ञानेश्वर आनकाडे, ज्ञानेश्वर कांदे, धनलाल जाधव, अशोक राठोड, दादाराव डोंग यांच्यासह बोधडी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गणेश कराड, सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद जाधव व त्यांच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला. तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न केले.यावेळी महसूल विभागाचे नायब तहसीलदार चंद्रशेखर सहारे, वीज वितरण कंपनीचे नामदेव केंद्रे तसेच कृषी विभागाचे उत्तम नखाते हे अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते.
Tags
||जिल्हा||
