किनवट : जोडो युवा अकादमी संचलित साने गुरुजी इमर्जन्सी अॅण्ड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवारी (ता.८ ) सकाळी १० वाजल्यापासून विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ९ कर्तबगार महिलांचा ‘नवरत्न’ म्हणून सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक बेलखोडे यांनी दिली.
महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने एमआयडीसी नांदेड रोडवरील साने गुरुजी इमर्जन्सी अॅण्ड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे हे विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये तालुक्यातील महिलांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात येणार असून आवश्यक त्या आरोग्यविषयक मार्गदर्शनाचाही लाभ महिलांना दिला जाणार आहे.
याशिवाय समाजाच्या विविध क्षेत्रांत आपले कार्य व योगदानातून वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांचा गौरव करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, आरोग्य सेविका, बचतगट अध्यक्ष, आरोग्य पर्यवेक्षिका, शिक्षिका तसेच महिला सरपंच अशा विविध क्षेत्रांतील एकूण ९ कर्तबगार महिलांचा ‘नवरत्न’ म्हणून विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
किनवट शहर व परिसरातील सर्व महिलांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा तसेच नवरत्न सत्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक बेलखोडे यांनी केले आहे.
Tags
||जिल्हा||