किनवटमध्ये २२ मार्चला सर्वधर्मीय उपवधू-वर परिचय व विवाह मेळावा


किनवट, ता.७  : समाजातील विधवा, विधुर, परित्यक्ता, घटस्फोटित तसेच दिव्यांग व्यक्तींना नव्याने संसार उभा करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, किनवटच्या वतीने २२ मार्च २०२६ रोजी कलावती गार्डन येथे सर्वधर्मीय उपवधू-वर परिचय व विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा जास्तीत जास्त गरजूनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक प्रा. जयश्री भरणे यांनी केले आहे.

    आधार संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच निराधार घटकातील विधवा, विधुर, परित्यक्ता, घटस्फोटित आणि दिव्यांग व्यक्तींना योग्य जीवनसाथी मिळावा, हा या मेळाव्यामागील मुख्य उद्देश आहे. मागील वर्षी झालेल्या मेळाव्यात मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा तसेच इतर राज्यांमधून शंभरहून अधिक उपवधू-वरांनी सहभाग नोंदविला होता. यंदाही मोठ्या संख्येने सहभाग अपेक्षित आहे. मेळाव्यात विवाहबद्ध होणाऱ्या जोडप्यांना वधूसाठी सोन्याचे मनी-मंगळसूत्र व चांदीचे जोडवे देण्यात येणार असून गरजू विधवा महिलांना साडी व शिलाई मशीनचे वाटपही करण्यात येणार आहे.
    या मेळाव्यात केवळ परिचयच नव्हे, तर पसंती झाल्यास नातेवाईकांच्या संमतीने विवाह किंवा पुनर्विवाहही लावून देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी बायोडाटा (दोन प्रती), आधारकार्डाची छायांकित प्रत, घटस्फोटित असल्यास न्यायालयाचा निर्णय किंवा विधवा असल्यास पतीचा मृत्यू दाखला तसेच दिव्यांग असल्यास प्रमाणपत्राची प्रत सादर करणे आवश्यक आहे.
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp