किनवट : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त शहरात एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. युवा उद्योजक तथा VIP रीयल इस्टेट व VIP ऑफिसचे संचालक आशिष विठ्ठलराव शेळके यांच्या संकल्पनेतून व स्वखर्चातून शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक’ असा डिजिटल फलक उभारण्यात आला.
जयंती समितीच्या आग्रहास्तव हा डिजिटल फलक आशिष शेळके यांच्या हस्ते अनावरण करण्यात आला असून, किनवट शहरासाठी हे एक ऐतिहासिक धम्मदान ठरले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील या परिसराला ‘आंबेडकर चौक’ म्हणून ओळखले जात असले, तरी त्या नावाचा अधिकृत फलक किंवा दर्शनी ओळख नव्हती. ही बाब जयंती समितीचे अध्यक्ष आकाश आळणे, सचिव प्रतिकेश ओंकार तसेच इतर सदस्यांनी आशिष शेळके यांच्या निदर्शनास आणून दिली.
या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत आशिष शेळके यांनी तात्काळ स्वखर्चातून डिजिटल फलक उभारण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, अवघ्या आठ दिवसांत आकर्षक व देखणा डिजिटल बोर्ड तयार करून १४ एप्रिल रोजी तो बसवण्यात आला.
या उपक्रमाचे सर्व स्तरांतून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. समाजासाठी काहीतरी देणे लागते या भावनेतून ‘फुल न फुलाची पाकळी’ म्हणून योगदान देण्याची प्रेरणा आशिष शेळके यांनी कृतीतून दिली आहे, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
Tags
||महाराष्ट||

