किनवट : अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आयोजित नांदेड जिल्ह्याचे ११वे अधिवेशन आज(ता.१६) पंचायत समिती जवळील सहारा गेस्ट हाऊस येथे उत्साहपूर्ण वातावरणात सुरू झाले. शेतकरी, कामगार आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींच्या मोठ्या उपस्थितीत अधिवेशनाची सुरुवात झाली.प्रारंभी संघटनेचे ध्वजवंदन अर्जुन आडे यांच्या हस्ते झाले.
या अधिवेशनाचे उद्घाटन किसान सभेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अर्जुन आडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य विजय गाभणे यांनी शेतकऱ्यांसमोरील सध्याच्या आव्हानांवर प्रकाश टाकत संघटित लढ्याची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमास 'सिटू', कामगार संघटनेचे गंगाधर गायकवाड, जनवादी महिला संघटनेच्या सुनिता बोनगिरवार तसेच डीवायएफआयचे स्टॅलिन आडे यांनी शुभेच्छा देत विविध सामाजिक व आर्थिक प्रश्नांवर आपले विचार मांडले.
मंचावर खंडेराव कानडे, शैलिया आडे आणि किशोर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माकप नांदेड जिल्हा सचिव शंकर सिडाम यांनी केले.
या अधिवेशनात किनवट, माहूर, भोकर, मुखेड, नांदेड आणि हिमायतनगर या तालुक्यांतील प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. अधिवेशनादरम्यान शेतकरी प्रश्न, हक्कांसाठीचे आंदोलन आणि संघटनात्मक बळकटी यावर सखोल चर्चा होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
Tags
||जिल्हा||
