नांदेडमध्ये २२ वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन १५ जून रोजी; साहित्य, कविता आणि सामाजिक विचारांचा संगम


नांदेड : सत्यशोधक विचारमंच आणि नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कामगार-कर्मचारी युनियन (रजि.) यांच्या संयुक्त विद्यमाने २२ वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन रविवारी १५ जून २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रेरणेने हे संमेलन पार पडणार असून साहित्य, समाजप्रबोधन आणि परिवर्तनवादी विचारांचा उत्सव म्हणून याकडे पाहिले जात आहे.

    संमेलनाच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ लेखक व पत्रकार मा. संजय आवटे भूषविणार आहेत. राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य अॅड. गोरक्ष लोखंडे उद्घाटक म्हणून उपस्थित राहतील. यावेळी क्रांतिकारी बीजभाषण आणि चिंतनशील संदेशाचे कार्यक्रमही होणार आहेत. विविध क्षेत्रातील साहित्यिक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दुपारच्या सत्रात काव्य पौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ज्येष्ठ कवयित्री ज्योती परांजपे कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील. प्रसिद्ध विद्रोही कवी नितीन चंद्रशेखर डांगळेकर हे विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. राज्यातील अनेक नामवंत कवी आपल्या कविता सादर करणार आहेत.
    सायंकाळी आयोजित प्रकट मुलाखत या सत्रात सुप्रसिद्ध सिनेनिर्माते व ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाचे निर्माते अभिजित ढोले पाटील यांची मुलाखत ज्येष्ठ विचारवंत डॉ. भीमराव हाटकर घेणार आहेत.
संमेलनादरम्यान विविध साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, पत्रकारिता आणि आंबेडकरी चळवळीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रेट डिबेटी अवॉर्ड २०२५’ हा पुरस्कार कोल्हापूरचे युवा जाहिरात क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व स्मृतीशेष गोमटेगुरुजी हाटकर यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
   संमेलनाचे मुख्य संयोजक पँथर गणेश शिंगे, स्वागताध्यक्ष प्रज्ञाकर ढवळे, संयोजक लालाबाजी घाटे, निमंत्रक जी. पी. मिसाळे तसेच विविध समित्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संमेलनाच्या तयारीत व्यस्त आहेत. परिवर्तनवादी साहित्य, सामाजिक समता आणि लोकशाही मूल्यांचा जागर करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp