छत्रपती संभाजीनगर दि. ५ : अनुसूचित जातींच्या संविधानिक आरक्षणाचे संरक्षण, सामाजिक ऐक्य दृढ करणे आणि आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी "उपवर्गीकरण हटाव-आरक्षण बचाव" या विषयावर भव्य संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता तापडिया नाट्य मंदिर, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर येथे पार पडणार आहे.
या परिषदेचे नेतृत्व व प्रमुख मार्गदर्शन रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर करणार आहेत. अनुसूचित जातींमधील एकजूट अबाधित ठेवणे, संविधानिक हक्कांचे संरक्षण करणे आणि सामाजिक न्यायासाठी व्यापक जनआंदोलन उभारणे हा परिषदेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
परिषदेत माजी सामाजिक न्याय मंत्री आ. राजकुमार बडोले, दैनिक सम्राटचे संपादक कुणाल कांबळे, माजी मंत्री बबनराव घोलप, साहित्यिक गंगाधर ढवळे, प्रबुद्ध साठे, देवानंद वानखेडे, प्रा. एम. एम. सुरनर, प्रा. किशोर बिर्ला, इंजि. विश्वादीप करंजीकर यांच्यासह विविध समाजघटकांचे प्रतिनिधी, अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.
परिषदेत अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण रद्द करणे, त्यासाठी नेमण्यात आलेली बदर समिती बरखास्त करणे, आरक्षणाची शंभर टक्के अंमलबजावणी करणे, रिक्त आरक्षित पदे तातडीने भरणे, अनुशेष भरतीसाठी विशेष मोहीम राबविणे, डी-रिझर्वेशन प्रक्रिया थांबविणे, रोस्टर प्रणाली पारदर्शक करणे तसेच शिक्षण, शिष्यवृत्ती आणि संशोधनाच्या संधी वाढविणे या प्रमुख मागण्यांवर चर्चा होणार आहे.
खाजगीकरणामुळे कमी होत असलेल्या आरक्षणाच्या संधींवर नियंत्रण, खाजगी व सहकार क्षेत्रात आरक्षण धोरणाची अंमलबजावणी, तसेच संसद व विधानसभेत आरक्षण अंमलबजावणीवरील वार्षिक श्वेतपत्रिका सादर करण्याची मागणीही परिषदेत करण्यात येणार आहे.
अनुसूचित जातीतील विविध समाजांचे प्रतिनिधी, सामाजिक संघटना आणि आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने परिषदेत सहभागी होणार असून, आरक्षणाच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याला बळ देण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपब्लिकन सेना, महाराष्ट्रच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags
||महाराष्ट||
