किनवट, ता. १४ : आदिवासी गोर-बंजारा बहुल आणि दुर्गम डोंगराळ किनवट परिसरात गेल्या ३३ वर्षांपासून निरंतर आरोग्य सेवा व सामाजिक कार्य करणारे ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ तथा समाजसेवक डॉ. अशोक बेलखोडे यांना प्रकाश आनंद प्रतिष्ठाण पुरस्कृत आणि आनंदवन मित्र मंडळ, मुंबई आयोजित प्रतिष्ठेचा ‘समाजसेवा पुरस्कार २०२६’ शनिवारी (ता. १३) सायंकाळी साने गुरुजी इमर्जन्सी व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, कोठारी (ता. किनवट) येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
स्व. कमलाकर ठाणेकर यांच्या १२ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात आनंदवन मित्र मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र मेस्त्री यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बेलखोडे यांचा गौरव करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप रोख २५ हजार रुपये, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे होते.
किनवटसह आदिवासी व ग्रामीण भागातील नागरिकांना गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आरोग्य सेवा उपलब्ध करून देताना डॉ. बेलखोडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या या दीर्घकालीन सेवाभावी कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.
पुरस्कार वितरण सोहळ्यास शेकडो नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर आणि मुंबईहून आलेल्या पाहुण्यांची उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी डॉ. बेलखोडे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी काही मान्यवरांनी त्यांच्या सेवाकार्यासाठी आर्थिक मदतीचे धनादेशही सुपूर्द केले.सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनिल व्यवहारे यांनी केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष माधव बावगे हे उपस्थित होते.
या प्रसंगी भारत जोडो युवा अकादमी, साने गुरुजी रुग्णालय परिवार तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. बेलखोडे यांच्या आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा आढावा घेण्यात आला. त्यांच्या कार्यामुळे दुर्गम भागातील हजारो गरजू नागरिकांना आरोग्य सेवा मिळाल्याचे वक्त्यांनी नमूद केले.समाजसेवा, आरोग्य सेवा आणि मानवतेच्या मूल्यांची जोपासना करणाऱ्या डॉ. अशोक बेलखोडे यांच्या कार्याचा गौरव करणारा हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
Tags
||महाराष्ट||



