किनवट, दि. ११ : किनवटसह आदिवासी बहुल भागात गेल्या ३२ वर्षांपासून अविरत आरोग्य सेवा व सामाजिक कार्य करणारे ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ तथा समाजसेवक डॉ. अशोक बेलखोडे यांना प्रकाश आनंद प्रतिष्ठाण पुरस्कृत आणि आनंदवन मित्र मंडळ आयोजित प्रतिष्ठेचा ‘समाजसेवा पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. स्व. कमलाकर ठाणेकर यांच्या १२ व्या स्मृतिदिनानिमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे आहे. विशेष म्हणजे हा गौरव सोहळा किनवट नगरीतच संपन्न होणार असल्याने परिसरातील नागरिक, मित्रपरिवार आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉ. बेलखोडे यांनी आरोग्य क्षेत्राबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण व आदिवासी भागातील जनतेसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या दीर्घकालीन सेवाभावी कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
पुरस्कार वितरण समारंभ शनिवार, दि. १३ जून २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता "साने गुरुजी इमर्जन्सी व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल", एमआयडीसी कोठारी, ता. किनवट, जि. नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे.
या प्रसंगी डॉ. अशोक बेलखोडे यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारत जोडो युवा अकादमी व साने गुरुजी रुग्णालय परिवार, किनवट यांच्या वतीने करण्यात आले आहे.
 |
| डॉक्टर अशोक बेलखोडे |