Type Here to Get Search Results !

धन्वंतरी पूजन व गुणवानांचा सत्कार सोहळा आयएमए व साने गुरुजी रुग्णालयात उत्साहात

किनवट, दि. १८ : आयएमए , केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन व साने गुरुजी रुग्णालय व संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने काल (दि.१८) धन्वंतरी पूजन व वैद्यकीय शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम “साने गुरुजी इमर्जन्सी अँड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल” एमआयडीसी, किनवट येथे भव्य वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमात एकूण ३० वैद्यकीय शाखेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ आणि साधना साप्ताहिकाचा दिवाळी विशेषांक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष योगाचार्य अखिल खान होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जोशी कोचिंग क्लासेसचे संचालक सदाशिव जोशी आणि केमिस्ट असोसिएशनचे संतोष तिरमनवार हे उपस्थित होते. यावेळी राजारामजी गटलेवार, के. मुर्ती, अरुणकुमार वतनेवकील, विनोद सुंकरवार, डॉ. योगेंद्र वरटकर, डॉ. भाग्यश्री बेलखोडे, डॉ. शुभम पवार, डॉ. मधुसुदन यादव, मेरसिंह चव्हाण आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात रुग्णालयाच्या परिसरातील वृक्षारोपण व धन्वंतरी पूजनाने करण्यात आली. रुग्णालयाचे संचालक डॉ. अशोक बेलखोडे यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाचा हेतू स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिरीष पत्की यांनी मनमोहक पद्धतीने केले. या उपक्रमातून वैद्यकीय क्षेत्रातील नव्या पिढीला प्रेरणादायी संदेश देण्यात आला असून, समाजाभिमुख कार्याच्या दिशेने हे एक स्तुत्य पाऊल ठरले आहे.

Post a Comment

0 Comments