किनवट : किनवट तालुक्यातील विविध भागांमध्ये कार्यरत असलेल्या अनेक पेट्रोल पंपांवर ग्राहकांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.संबधीतांनी अशा मुलभूत सुविधांचा अभाव असलेल्या पेट्रोल पंप चालकांविरोधात कारवाई करावी , अशी मागणी किनवट तालुका ग्राहक पंचायत या संघटनेचे अध्यक्ष ॲड.मिलिंद सर्पे यांनी केली आहे.
पिण्याचे पाणी, स्वच्छ शौचालय, बसण्यासाठी जागा, महिलांसाठी स्वतंत्र सुविधा, अग्निशामक यंत्रणा, तसेच प्राथमिक उपचार पेटी यांसारख्या सुविधा अनेक ठिकाणी नाहीत. परिणामी वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
वाहनधारकांना इंधन भरण्यासाठी थांबावे लागते, मात्र या वेळेत पाणी प्यायचे असो किंवा शौचालय वापरायचे असो बहुतांश ठिकाणी त्या सुविधा उपलब्ध नाहीत. काही पंपांवर स्वच्छतेचा अभाव असल्याने तेथे दूषित वातावरण निर्माण झाले आहे.
सुशिक्षित नागरिकांचे म्हणणे आहे की, “पेट्रोल पंप परवाना घेताना या सर्व सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक असते. तरीसुद्धा बहुतांश ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत आहे.”
ग्राहक कल्याणासाठी केंद्र सरकार आणि तेल कंपन्यांनी स्पष्ट नियम केलेले असून प्रत्येक पंपावर मुलभूत सुविधा असणे अनिवार्य आहे. तरीदेखील प्रत्यक्षात या नियमांचे पालन होत नसल्याचे वास्तव उघड झाले आहे.
त्यामुळे संबंधित तेल कंपन्या व स्थानिक प्रशासनाने निष्काळजी पंपधारकांविरुद्ध कारवाई करावी, तसेच सर्व पंपांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी किनवट तालुका ग्राहक पंचायतीने केली आहे. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयींना आळा बसेल, असा जनतेचा विश्वास आहे.
Tags
जिल्हा