Type Here to Get Search Results !

गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात भव्य वैद्यकीय व दंत महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

किनवट : येथून जवळच असलेल्या गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान व “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” अंतर्गत भव्य मोफत वैद्यकीय व दंत महाआरोग्य शिबिराचे आयोजन नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमाध्यक्ष आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, सामान्य रुग्णालय नांदेडचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे, रुग्ण कल्याण समिती सदस्य गंगन्नाना नेम्माणीवार, गोकुळ भवरे, अखिल खान, पत्रकार संघाचे तालुका सचिव बालाजी शिरसाठ, पत्रकार कार्यकर्त्या परवीन बेगम तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. के. पी. गायकवाड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामीण रुग्णालय माहूरचे अधीक्षक डॉ. किरणकुमार वाघमारे, मांडवीचे अधीक्षक डॉ. विक्रम राठोड व खान अब्दुल गफारखान नेत्र रुग्णालय मांडवीच्या डॉ. अंजली पाटील यांची देखील व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रास्ताविक उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दत्ता केंद्रे यांनी केले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनही केले. "१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ग्रामीण भागात तब्बल ७६ शिबीरे घेण्यात आली असून सुमारे ४९ हजार रुग्णांची तपासणी झाली आहे. यात रक्तदाब व मधुमेहाचे प्रत्येकी ९५०० रुग्ण, कॅन्सर तपासणीतील ४००० रुग्ण आणि तब्बल १४ हजार किशोरवयीन मुलींची तपासणी करण्यात आली. तसेच किनवट येथे २०० खाटांचे व स्वतंत्र स्त्री रुग्णालय मंजूर झाले आहे." – डॉ. संजय पेरके, जिल्हा शल्य चिकित्सक, नांदेड
"गोरगरीब रुग्णांच्या आयुष्यात नवसंजीवनी देणारी ही शिबीरे खरोखरच उपयुक्त ठरत आहेत. ग्रामीण भागातील सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता यांच्या जयंती निमित्त राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत प्रत्येकाने लाभ घ्यावा." – आमदार भीमराव केराम, किनवट शिबिराच्या पहिल्याच दिवशी तब्बल १२९२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे २ ऑक्टोबर रोजी मोफत शस्त्रक्रिया आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. अहसान जुबेरी, डॉ. मनोज घडसिंग, डॉ. सुरजकुमार वाकोडे, डॉ. अश्विनकुमार बोमकंटीवार, डॉ. वैजनाथ साठे, डॉ. सुनंदा भालेराव, डॉ. अभिमन्यू केंद्रे, डॉ. शुभम पवार, डॉ. आदित्य बदने, डॉ. स्वाती केंद्रे आदींसह सर्व वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ व कर्मचारी मनापासून पुढाकार घेतला होता.

Post a Comment

0 Comments