अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे स्वप्न पाण्यात; ५६ हजार हेक्टरवरील पिके वाहून गेली, कर्जफेडीची संकटे
October 05, 2025
0
किनवट :तालुक्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. सततच्या मुसळधार पावसाने खरीप हंगामाची सर्व आशा धुळीस मिळाली असून, पिकांसह जमीन वाहून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या अतिवृष्टीमुळे तालुक्यात तब्बल ५६,६३४ हेक्टर जिरायत क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून ५८ हजारांहून अधिक शेतकरी बाधित झाले आहेत.
तालुक्यात यंदा सरासरीच्या १४२ टक्के पाऊस पडला आहे. या अवकाळी पावसाने पिकांसह सणांचा उत्साहही वाहून नेला आहे. अनेक शेतकरी दसरा-दिवाळीसाठी सणसज्जतेऐवजी बँक कर्ज आणि उसनवारी फेडायच्या चिंतेत आहेत.
||पूर आणि पावसाने हाहाकार||
१३ ऑगस्टपर्यंत पावसाने दगा दिला होता. पण १६ ऑगस्टपासून सुरू झालेल्या सलग पावसाने नदी-नाल्यांना पूर आला. सखल भाग पाण्याखाली गेले आणि अनेक शेतजमिनी गाळाखाली गाडल्या गेल्या. या पूरस्थितीत १७६ गावांचा तडाखा बसला.
प्रशासनाकडून मिळालेल्या संयुक्त अहवालानुसार, या नुकसानीसाठी ४८१ कोटी ३८ लाख २० हजार रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. पीडित शेतकऱ्यांची नावे व बँक खात्यांचे तपशील अपलोड करण्याचे काम सुरू आहे.
||मानवी व प्राणीहानी||
अतिवृष्टीदरम्यान तीघांचा मृत्यू झाला, तर एका तरुणाचा (लक्ष्मण रणमाले, घोटी) शोध अद्याप लागलेला नाही. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाखांची आर्थिक मदत देण्यात आली. विजेच्या धक्क्याने जखमी झालेल्या दोघांना ५४ हजारांची मदत मिळाली आहे.
जनावरांच्या बाबतीतही मोठे नुकसान झाले असून, ६० जनावरे दगावली. त्यापैकी ४२ प्रकरणांत १० लाख ३७ हजार रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.
||घरांची पडझड व अन्नदात्यांचे दु:ख||
पूरपाण्यामुळे ६०० हून अधिक घरांमध्ये पाणी शिरले, त्यापैकी ६३ कुटुंबांना ६.३० लाखांची मदत मिळाली आहे. मात्र ६१ घरांची व ६ गोठ्यांची पडझड झाल्याचे नोंद असून, संबंधितांना अद्याप मदत मिळालेली नाही.
||सोयाबीन आणि खरीप पिकांची उध्वस्तता||
तालुक्यातील प्रमुख पिकांपैकी सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काढणीला आलेले पीक पाण्यात बुडाल्याने शेंगा सपाट पडल्या; अनेक ठिकाणी दाण्यांना उगवणी आली आहे. काही शेतकऱ्यांचा सव्वा लाख रुपयांपर्यंतचा खर्च वाया गेला आहे.
||शेतकऱ्यांची मागणी||
शासनाने जाहीर केलेल्या १३,६०० रुपयांच्या मदतीची रक्कम अपुरी असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. “दोन हेक्टर मर्यादा वाढवून ती तीन हेक्टरपर्यंत करावी आणि मदतीची रक्कम तातडीने मिळावी,” अशी मागणी अंबाडी येथील शेतकरी रत्नाकर मुनेश्वर यांनी केली.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा नैराश्य दाटले आहे. “हाती आलेलं पीक गेलं, कर्ज कसं फेडायचं?” या प्रश्नाने संपूर्ण तालुका व्यथित झाला आहे.
Post a Comment
0 Comments