नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड तर्फे आयोजित युवक महोत्सव 12 ते 15 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस, नांदेड येथे उत्साहात पार पडला. या महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले अंनिस नांदेड तर्फे आयोजित “विवेक रेषा” व्यंगचित्र प्रदर्शन, ज्याने उपस्थितांच्या मनावर ठसा उमटवला.या प्रदर्शनासाठी अंनिस चे राज्य पदाधिकारी सम्राट हटकर यांनी पुढाकार घेतला होता.
या प्रदर्शनात भारतभरातील प्रतिष्ठित व प्रतिभावान व्यंगचित्रकारांनी अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक जागरूकता आदी विषयांवर साकारलेली व्यंगचित्रे प्रदर्शित करण्यात आली होती. विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिकांनी या सर्जनशील उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला.
कार्यक्रम प्रसंगी ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पसचे डॉ. विजय पवार, मेडिकल सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. ओमप्रकाश दरक, विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. डॉ. राजेश्वर दोडूकनाळे, प्राचार्य डॉ. मा. मा. जाधव तसेच प्राध्यापक मंडळी उपस्थित होते.
या युवक महोत्सवात नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. शेजारील एसजीजीएस अभियांत्रिकी महाविद्यालय, सहयोग कॉम्प्लेक्स तसेच नांदेड शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनीही महोत्सव व प्रदर्शनास भेट देऊन अंधश्रद्धा निर्मूलनाच्या या संदेशात्मक उपक्रमाचे कौतुक केले.
अंनिसच्या “विवेक रेषा” प्रदर्शनाने युवकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकशील विचारसरणी आणि सामाजिक जबाबदारीची भावना दृढ करण्याचा प्रयत्न केला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Tags
महाराष्ट्र
