किनवटच्या बळीराम पाटील महाविद्यालयाला आदिवासी नृत्य प्रकारात द्वितीय पारितोषिक
October 18, 2025
0
किनवट, ता.१८ (बातमीदार): स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आयोजित अंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ‘ज्ञानतीर्थ २०२५’ मध्ये येथील बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने आदिवासी नृत्य प्रकारात द्वितीय पारितोषिक पटकावून यश संपादन केले आहे.
या विजयानंतर प्राचार्य डॉ. शिवराज बेंबरेकर, उपप्राचार्य डॉ. पंजाब शेरे व कार्यालयीन अधीक्षक यमुना कुमरे यांनी विजयी संघ व्यवस्थापक व विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
तेलंगणा सीमेलगत असलेल्या या भागात गोंड, कोलाम, प्रधान अशा आदिवासी जमातींचे वास्तव्य असून, त्यांची स्वतःची समृद्ध संस्कृती आणि परंपरा आजही जपली जाते. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ‘विजयादशमी ते दीपावली पर्यंत साजरा होणारा आनंदोत्सव’ या संकल्पनेवर आधारित आदिवासी नृत्य सादर केले. या नृत्यातून निसर्गदेवतेची पूजा, आराधना आणि निसर्गाशी असलेले नाते प्रभावीपणे मांडले गेले.
या विजयी पथकात आशीष मंगाम, रूपेश तोडसाम, उदयकिरण घोडाम, ओंकार कुरसंगे, प्रथमेश मेश्राम, कौशल्या पेंदोर, शिवलता कोरांगे, वीरांगणा मंडळे, नागम्मा शेडमाके, मोनिका मेश्राम या विद्यार्थ्यांचा समावेश होता. तसेच श्रावणी कदम हिने वैयक्तिक स्पर्धेत सहभाग नोंदवला.
संघाचे व्यवस्थापक व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा .शेषराव माने, तर संघ व्यवस्थापिका प्रा. डॉ. सुलोचना जाधव व डॉ. रचना हिपळगावकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विजयानंतर सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी संघाचे अभिनंदन केले.
•मिलिंद सर्पे,बातमीदार, किनवट,ता.१८/१०/२०२५- 5:13PM

Post a Comment
0 Comments