सामाजिक युवा नेतृत्व संतोष मारपवार यांच्या मातोश्री प्रेमला रमेश मारपवार या प्रभाग २ मधून निवडणूक लढणार!
October 13, 2025
0
किनवट,दि.१३ : आगामी किनवट नगर परिषद निवडणुकीत अनुसूचित जाती महिला राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक २ मधून सामाजिक कार्यकर्ते संतोष रमेश मारपवार यांच्या आई प्रेमला रमेश मारपवार यांनी जनसेवेचा वसा घेऊन निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
   गेल्या अनेक वर्षांपासून शहरात आणि परिसरात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे त्या सक्रिय आहेत. विविध उपक्रमांद्वारे त्यांनी जनतेत आपली ओळख निर्माण केली आहे. याच सामाजिक कार्याच्या आधारे नागरिकांमध्ये मारपवार कुटुंबाबद्दल विश्वास व आत्मीयतेचे नाते निर्माण झाले आहे. प्रभाग क्रमांक २ हा अनुसूचित जाती महिला राखीव असून या भागात विविध वस्ती, समाज आणि समुदाय एकत्र राहतात. नागरिकांना पाणीटंचाई, रस्त्यांची अवस्था, गटारव्यवस्था आणि आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी तसेच या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी त्या सज्ज असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, स्थानिक नागरिक आणि महिला वर्गातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. "आम्ही परिवर्तनाच्या दिशेने मतदान करू, ज्यांनी समाजासाठी काम केले आहे त्यांनाच संधी दिली पाहिजे," असे नागरिकांनी प्रतिक्रिया देताना म्हटले. संतोष मारपवार यांनी यापूर्वी विविध सामाजिक संस्थांमधून कार्य करताना जनतेशी घनिष्ठ संपर्क ठेवला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांच्या मातोश्रींना जनतेचा पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडींमुळे नगर परिषद निवडणुकीतील प्रभाग क्रमांक २ मध्ये परिवर्तनासाठी लढत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सामाजिक कार्याच्या बळावर मारपवार कुटुंबाचा प्रभाव या निवडणुकीत कितपत उमटतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
   मारपवार यांच्या मातोश्रींनी उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. समाजकार्य, लोक संपर्क आणि कार्यकर्त्यांशी चर्चा व लोकभावना लक्षात घेऊन पक्षाची निवड करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


Post a Comment
0 Comments