१४ ऑक्टोबरपासून एस.टी. कामगारांचे राज्यव्यापी धरणे आंदोलन

किनवट : राज्य परिवहन महामंडळातील प्रलंबित वेतनवाढ, आर्थिक लाभ आणि इतर न्याय्य मागण्यांसाठी महाराष्ट्र एस.टी. कामगार संयुक्त कृती समितीने राज्यभर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार किनवट आगारातील कामगार १४ ऑक्टोबरपासून आगाराच्या प्रवेशद्वारासमोर शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलनास सुरुवात करणार आहेत. यासंदर्भात किनवट आगार शाखेच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले असून, आंदोलन संपूर्णतः शांततापूर्ण पद्धतीने पार पडेल, अशी माहिती देण्यात आली आहे. शासन आणि प्रशासनाला याबाबत पूर्वसूचना देण्यात आली असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या आंदोलनात महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना, एस.टी. कामगार सेना, कास्ट्राईब रा.प. परिवहन संघटना, आणि बहुजन रा.प. अधिकारी-कर्मचारी संघटना या चार प्रमुख संघटना सहभागी होणार आहेत. संयुक्त कृती समितीने शासनाकडून मागण्यांची पूर्तता होत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यभरातील सुमारे २५० पेक्षा अधिक आगारांमध्ये हे आंदोलन होण्याची शक्यता असून, वेतनवाढ, सेवा स्थैर्य आणि सेवानिवृत्ती वेतनाशी संबंधित मागण्या या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहेत. गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू असूनही ठोस निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शासनाने तत्काळ सकारात्मक तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा समितीकडून देण्यात आला आहे.
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp