“विकासाच्या बळावर भाजपचा विजय निश्चित” : खा. अशोकराव चव्हाण सारखणी येथे भाजपचा आढावा बैठक व भव्य पक्ष प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला
October 13, 2025
0
किनवट,दि.१३ : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सारखणी(ता.किनवट)येथे भारतीय जनता पक्षाची आढावा बैठक आणि भव्य पक्ष प्रवेश सोहळा उत्साहात नुकताच पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री व खासदार खा. अशोकराव चव्हाण होते.
कार्यक्रमास आमदार भीमराव केराम, माजी आमदार अमरनाथ राजरकर, भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर देशमुख, तसेच  तालुक्यातील पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभा सुरू होताच घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. नव्याने भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत फुलांच्या हारांनी व जल्लोषात करण्यात आले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात खा. अशोकराव चव्हाण म्हणाले, की,“आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष आपली ताकद दाखवून देईल. केंद्र व राज्य सरकारने जनतेसाठी राबविलेल्या विकास योजनांमुळे लोकांचा विश्वास दृढ झाला आहे. विकासाच्या माध्यमातूनच जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकवू.”
ते पुढे म्हणाले की, कार्यकर्त्यांनी गावपातळीवर जनसंपर्क वाढवून शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवावा. विरोधक केवळ टीका करण्यात गुंतलेले असतात, मात्र भाजप सरकार प्रत्यक्ष विकास करून दाखवते.
या वेळी आमदार भीमराव केराम यांनी ग्रामीण भागातील विकासकामांचा आढावा घेत शेतकरी, विद्यार्थी व महिलांसाठी सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. माजी आमदार अमरनाथ राजरकर यांनी पक्ष संघटन बळकटीसाठी कार्यकर्त्यांना प्रेरित केले.
भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर देशमुख यांनी प्रत्येक मतदारसंघात पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात तालुक्यातील अनेक काँग्रेस आणि इतर पक्षांचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करून खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
सभेचे सूत्रसंचालन बाळकृष्ण कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन उमाकांत कऱ्हाळे यांनी केले.
या प्रसंगी सुधाकर भोयर, दिनकर चाडावर, नारायणराव सिडाम, डॉ. देवसरकर, दिनकर दहिफळे, किशोर स्वामी, प्रा. किसन मिरासे, व्यंकटराव नेम्मानिवार, अनिल तिरमनवार, आनंद मच्छेवार, नविन राठोड, संदिप केंद्रे, संध्या राठोड, प्रा. मिरासे, तसेच अनेक स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
Tags

Post a Comment
0 Comments