किनवट : अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने किनवट तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सोयाबीन, कापूस, मका, ज्वारी आणि तूर या प्रमुख पिकांची हमीभावाने (MSP) तात्काळ खरेदी सुरू करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.
या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले असून, कर्तार साबळे (खासदारांचे स्वीय सहाय्यक) यांनी हे निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, यंदा किनवट तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने खरीप पिके घेतली. मात्र, सलग झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातच बाजारात दर कोसळल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती गंभीर झाली आहे.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने सीसीआय (Cotton Corporation of India), नाफेड (NAFED) यांसारख्या शासकीय संस्थांना तातडीने हमीभावाने खरेदी सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री कार्यालयाच्या डाक विभागात (DAK Section) हे निवेदन ११ नोव्हेंबर २०२५ रोजी प्राप्त झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
या मागणीमुळे किनवट परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला असून, केंद्र सरकारकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Post a Comment
0 Comments