Type Here to Get Search Results !

“गुंडांचे चमचे बनू नका, तत्त्वाचे कार्यकर्ते बना” : आंबेडकरवादी मिशनचे दीपक कदम यांचे आवाहन

नांदेड : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी राज्यातील तरुणांना तत्त्वनिष्ठ राजकारण आणि समाजकारणाचा संदेश देत गुंडगिरीपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

कदम यांनी म्हटले की, “आगामी निवडणुकीत किती आंबेडकरवादी प्रतिनिधी निवडून येतील हे महत्त्वाचे नाही, पण १५ ते २५ वयोगटातील हजारो बेरोजगार तरुणांचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. यातून समाजासाठी धोकादायक अशी गुंड प्रवृत्तीची नवी पिढी तयार होईल.”

त्यांनी पुढे सांगितले की, “दलित वस्त्यांमध्ये कॅरम, पत्ते, दारू, गांजा यासारख्या अवैध विक्रीत वाढ झाल्यास तरुण चुकीच्या मार्गावर जातील. अशा वातावरणामुळे शिक्षणाची हानी होऊन परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण होते. मुलींना शाळा-कॉलेजात जाण्याची भीती वाटू लागते आणि गुन्हेगारीला खतपाणी मिळते.”

कदम म्हणाले, “स्थानिक गुंड आणि स्वघोषित नेत्यांच्या प्रभावाखाली जाण्याऐवजी तरुणांनी शिक्षण, स्वाभिमान आणि तत्त्वनिष्ठ आंबेडकरवादी विचार स्वीकारावेत. राजकारण करा, पण चुकीच्या प्रवृत्तींच्या लोकांचे हस्तक बनू नका. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला शासनकर्ते होण्याचा संदेश लक्षात ठेवा  त्यासाठी शिक्षण, संघटन आणि तत्त्वनिष्ठ लढा हाच योग्य मार्ग आहे.”

शेवटी त्यांनी तरुणांना संदेश दिला की,

“शिक्षित बना, स्वाभिमानी बना आणि आंबेडकरवादी बना.
समाजात विचारांचा प्रसार करा, रोजगार निर्माण करा, अधिकारी, उद्योजक बना, पण कोणाच्याही गुंडगिरीला बळी पडू नका.”


Post a Comment

0 Comments