किनवट : येथील नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक शांततेत, भयमुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी प्रत्येक नागरिकाने पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी केले आहे.
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. ११) किनवट पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. कराड म्हणाले की, निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे. शहरातील सर्व प्रभागांमध्ये कॉर्नर मिटिंग्स घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.
सोशल मीडियावर पोलीस प्रशासनाची करडी नजर ठेवली जाणार आहे. उमेदवारांविषयी वैयक्तिक टीका, जाती-धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. “अफवांवर विश्वास ठेवू नका, सोशल मीडियावरील माहितीची खातरजमा केल्याशिवाय ती फॉरवर्ड करू नका,” असे आवाहन कराड यांनी युवकांना केले.
निवडणुकीच्या काळात गोकुंदा, मांडवा रोड व घोटी फाटा येथे नाकाबंदी करण्यात येणार आहे. तसेच मतदानाच्या आधी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त शहरात तैनात केला जाणार आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून मथुरानगर, सुभाषनगर, उर्दू शाळा, बाबासाहेब मुखरे विद्यालय, इस्लामपूरा येथील शादीखाना आदी मतदान केंद्रांची संयुक्त पाहणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर, सहायक निवडणूक अधिकारी तथा प्रभारी मुख्याधिकारी सहास कांदे आणि पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी केली.

Post a Comment
0 Comments