किनवट, दि.१९ : किनवट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची प्रक्रिया वेग घेत असताना शहरातील शांतता, सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांनी निवडणूक काळात जबाबदारीने वर्तन करावे, असे आवाहन किनवट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी केले आहे.
पोलीस निरीक्षक कराड यांनी सांगितले की, रात्री १० नंतर अनावश्यकपणे घराबाहेर फिरणे टाळावे, तसेच रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी गटागटाने उभे राहून चर्चा करणे टाळावे. निवडणूक कालावधीत अशा गोष्टींमुळे गैरसमज, वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारी आवश्यक आहे.
याशिवाय, सोशल मीडियाचा गैरवापर कटाक्षाने टाळावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. व्हॉट्सअॅप ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम किंवा इतर प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह, दिशाभूल करणारे, भडकावू किंवा मतदारांवर परिणाम करणारे संदेश, पोस्ट, व्हिडीओ किंवा जाहिराती शेअर करू नयेत. निवडणुकीशी संबंधित कोणतीही जाहिरातबाजी करताना शासनाच्या नियमानुसार आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील सर्व प्रभागातून उमेदवार रिंगणात उतरत असताना शांतता आणि सुव्यवस्था टिकून राहणे अत्यंत गरजेचे असल्याचे कराड यांनी नमूद केले. नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करून निवडणूक प्रक्रिया निर्विघ्न आणि शांततेत पूर्ण व्हावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
