किनवट,दि.१९ : किनवट नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे. या निवडणुकीत राजकीय समीकरणात मोठा बदल घडवत माजी नगराध्यक्ष साजिदखान निसारखान यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, शरद पवार गटाने नगराध्यक्षपदासाठी साजिदखान यांच्या पत्नीची उमेदवारी निश्चित केली होती; मात्र त्यांच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे त्यांची पक्षातून तत्काळ हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
साजिदखान यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षांतर्गत निर्णय प्रक्रियेत अपेक्षित स्थान न मिळणे, स्थानिक स्तरावरील मतभेद आणि भविष्यातील राजकीय संधीबाबतची अनिश्चितता, या कारणांमुळे त्यांनी अखेरच्या क्षणी पक्षांतराचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, महायुतीकडून भाजपने माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांच्या पत्नी पुष्पा आनंद मच्छेवार यांच्यावर विश्वास दर्शवत त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. आनंद मच्छेवार यांच्या कार्यकाळात झालेला पाणीपुरवठा, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, बाजारपेठ विकास आणि उद्यान निर्मिती यांसारखी विकासकामे, तसेच त्यांची सकारात्मक प्रतिमा आणि स्थानिक संघटनात्मक ताकद लक्षात घेऊन भाजपने हा निर्णय घेतल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.
महाविकास आघाडीकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे सुजाता विनोद एन्ड्रलवार या उमेदवार आहेत. त्यांचे चिरंजीव करण एन्ड्रलवार हे स्थानिक युवकांमध्ये लोकप्रिय असून, त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा सुजाता एन्ड्रलवार यांना लाभ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच, काँग्रेसने स्थानिक पातळीवर वंचित बहुजन आघाडी सोबत युती न करता स्वतंत्र उमेदवार दिला असून, नगराध्यक्षपदासाठी शेख तय्यबा बेगम शेख खाजा मियां यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवला आहे. त्यामुळे किनवटमध्ये आता महायुती, महाविकास आघाडी आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत रंगण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.
||शेवटच्या दिवशी २८ अर्ज||
दरम्यान, नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी एकूण २८, तर नगरसेवकपदासाठी २६७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मंगळवारी(ता .१८)अर्जाची छाननी झाली.यात नगराध्यक्ष पदाचे १५ नामनिर्देशन पत्रे वैध ठरवीत,१३ अवैध ठरली. त्यापैकी नगराध्यक्ष पदासाठी किती उमेदवार रिंगणात राहतील व किती उमेदवार मागे घेतील याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आगामी काळात प्रचार मोहीम अधिक तीव्र होणार असून, मतदारांचा कल विकासकामे, विश्वासार्हता आणि स्थानिक नेतृत्वाच्या स्वीकारार्हतेवर अवलंबून असेल.
Tags
शहर
