किनवट,दि.१८ : कमठाला (ता. किनवट) स्वस्त धान्य वितरणाच्या ठिकाणी ई-पॉस मशिनच्या तांत्रिक अडचणीमुळे निर्माण झालेल्या वादातून दुकानदाराच्या सेल्समनला मारहाण केल्याची धक्कादायक घटना आज (ता.१८) कमठाला येथील दुकान क्रमांक ०७ येथे घडली. याबाबत दुकानदार सुरेखा विजय क-हाळे यांनी किनवट पोलिसात लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, सकाळी सुमारे ९ वाजता धान्य वाटप सुरू असताना नेटवर्क व सर्व्हर समस्येमुळे ई-पॉस मशिन सुरळीत चालत नसल्याने धान्य वितरणास विलंब होत होता. यावरून कार्डधारक पांडुरंग दिगांबर क-हाळे व त्यांचा मुलगा शिवम क-हाळे यांनी संताप व्यक्त करत सेल्समन शिवराज संभाजी पुटवाड याच्याशी वाद घातला. दोघांनी शिवीगाळ करत तुंबळ मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
इतकेच नव्हे, तर संतप्त दोघांनी ई-पॉस मशिनला लाथ मारून फेकून दिले तसेच टेबलावर पडलेली इतर लाभार्थ्यांची शासकीय रेशनकार्डेही उधळून दिली. “तुला या गावात शासकीय दुकान चालू देणार नाही,” अशी धमकी दिल्याचाही तक्रारीत उल्लेख आहे. संबंधित व्यक्ती यापूर्वीही वाटप प्रक्रियेत अडथळा आणतात व जातीवाचक शिवीगाळ करतात, असा दावा दुकानदाराने केला आहे.
घटनेदरम्यान उपस्थित असलेल्या काही ग्राहकांनी मध्यस्थी करत सेल्समनची सुटका केल्याचे सांगण्यात आले. या सर्व प्रकारामुळे सरकारी कामकाजात अडथळा निर्माण झाल्याने योग्य ती कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती तक्रारदार सुरेखा क-हाळे यांनी पोलिस निरीक्षकांकडे केली आहे.
Post a Comment
0 Comments