Type Here to Get Search Results !

लंडनमध्ये ‘आंबेडकर हाऊस’ आणि दिल्लीमध्ये ‘डॉ. आंबेडकर सामाजिक भवन’ उभारा : दीपक कदम

 नांदेड : आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांना निवेदन देत लंडनमध्ये “डॉ. आंबेडकर हाऊस” आणि नवी दिल्लीमध्ये “डॉ. आंबेडकर सामाजिक भवन” उभारण्याची मागणी केली आहे.

या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः राजर्षी शाहू महाराजांना लंडन येथे ‘इंडिया हाऊस’च्या धर्तीवर सामाजिक भवन उभारण्याची विनंती केली होती, परंतु आर्थिक कारणामुळे तो प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. आजही त्या विचाराची पूर्तता होणे अत्यावश्यक असल्याचे कदम यांनी सांगितले.

लंडन येथे जर “डॉ. आंबेडकर हाऊस” स्थापन झाले, तर लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स आणि कायद्याच्या शिक्षणासाठी दरवर्षी किमान १०० विद्यार्थ्यांना विदेशात पाठवण्याची संधी मिळेल, असे कदम यांनी नमूद केले. यामुळे दलित समाजातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण घेण्याची आणि कायदा व अर्थशास्त्र विषयातील बौद्धिक नेते निर्माण करण्याची संधी उपलब्ध होईल.

तसेच नवी दिल्ली येथे ‘डॉ. आंबेडकर सामाजिक भवन’ उभारून अधिकारी व उद्योजक घडविण्याचे केंद्र उभारावे, अशी मागणीही त्यांनी केली. यामुळे दिल्ली स्कूल ऑफ इकनॉमिक्ससह देशातील नामांकित उच्च शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना संधी मिळू शकेल.

दीपक कदम यांनी पुढे सांगितले की,

  • बार्टीमार्फत यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना जून महिन्यात दिल्लीला पाठवून त्यांची शिष्यवृत्ती ₹१२ हजारांवरून ₹३० हजारपर्यंत वाढवावी.
  • विदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७५ वरून किमान ५०० पर्यंत वाढवावी.
  • दलित समाजातील पाच हजार नवीन उद्योजक तयार करण्यासाठी विशेष योजना राबवावी.

आरक्षणविषयक तुकडे समाजाचे नुकसान करतील, त्यामुळे मंत्री शिरसाट यांनी याविषयी ठाम भूमिका घ्यावी, असे आवाहनही कदम यांनी केले. त्यांनी सांगितले की, “महाराष्ट्रातील दोन कोटी बौद्ध समाज आपल्याबरोबर उभा आहे.”

Post a Comment

0 Comments