किनवट,दि.२६ : तालुक्यातील घोटी गावची लेक आणि भावी डॉक्टर डॉ. समिक्षा सुरेखा सुरेंद्र पाटील हिने जिल्हा पातळीवरील निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत गावासह संपूर्ण तालुक्याचा अभिमान वाढवला आहे. ‘भारतीय संविधान’ या विषयावर उत्कृष्ट, सखोल आणि अभ्यासपूर्ण निबंध सादर केल्याबद्दल परभणीचे जिल्हाधिकारी मा. संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते तिचा मानाचा सत्कार करण्यात आला.
निबंध स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक प्रतिभावंत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मात्र, समिक्षाने तिच्या अभ्यासू दृष्टिकोन, संविधानावरील भक्कम आकलन आणि प्रभावी लेखनशैलीच्या जोरावर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.
सत्कार सोहळ्यात जिल्हाधिकारी चव्हाण साहेबांनी तिच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही अशीच निष्ठा व अभ्यास कायम ठेवण्याचे आवाहन केले.
घोटी गावची ही कन्या भावी डॉक्टर बनत असताना शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेला हा यशाचा टप्पा प्रेरणादायी ठरला आहे. गाव, तालुका तसेच शिक्षक-पालक वर्गात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
समिक्षाच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुकाची दाद मिळत असून, ती लहानग्यांसाठी आदर्श ठरत आहे.
Tags
||शहर||
